
नायगाव : बाळासाहेब पांडे
राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्व समाजघटकांना न्याय देणारा, सर्व धर्म व जातींना समान स्थान देणारा पक्ष आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि अहिल्याबाई होळकर यांच्या विचारांवर चालणारा हा पक्ष खऱ्या अर्थाने लोकशाहीचा प्रहरी आहे, असे प्रतिपादन आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केले. ते नायगाव येथे आयोजित जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपरिषद निवडणुकीच्या आढावा बैठकीत तसेच दिवाळी स्नेहभोजन कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन माजी मंत्री आणि खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या हस्ते झाले. व्यासपीठावर माजी आमदार सुभाष साबने, प्रदेश सरचिटणीस वसंत सुगावे, माजी जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधीकारी, प्रदेश उपाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, माजी आमदार मोहनराव हंबर्डे, माजी सभापती अशोक पाटील मुगावकर, शहराध्यक्ष जिवन चव्हाण, विक्रम देशमुख, माधवराव पावडे आदी मान्यवर उपस्थित होते. आमदार चिखलीकर म्हणाले, “अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित झाला आहे. त्यांनी शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर झटपट निर्णय घेत विकासाला गती दिली आहे. हाच वेग आणि कार्यशैली राष्ट्रवादी काँग्रेसला इतर पक्षांपासून वेगळं ठरवते.
ते पुढे म्हणाले, “अजित दादांच्या मंत्रिमंडळात सर्व समाजघटकांना योग्य प्रतिनिधित्व मिळाले आहे. महाराष्ट्रात समतोल आणि सर्वसमावेशक विकासाचा नवा अध्याय सुरू झाला आहे.”. शेवटी त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले, “जनतेत जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या विकासकामांची माहिती द्या, पक्षाची धोरणे समजवा आणि आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवण्याचा संकल्प करा. नायगाव, उमरी व धर्माबाद तालुक्यांत एकजुटीच्या बळावर विजय निश्चित आहे.”. “कार्यकर्त्यांची निष्ठा, जनसंपर्क आणि ठाम नेतृत्वच विजयाचे सूत्र”. माजी मंत्री व खासदार भास्करराव पाटील खतगावकर
“निवडणुकीत यश मिळवण्यासाठी कार्यकर्त्यांची जनसंपर्काची ताकद, पक्षावरील श्रद्धा आणि नेतृत्वावरील विश्वास अत्यंत महत्त्वाचा असतो,” असे मत खतगावकर यांनी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले, “अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सर्व समाजघटक एकदिलाने काम करत आहेत. शेतकऱ्यांसाठी सरकारने जाहीर केलेले ३२ हजार कोटींचे पॅकेज हे संवेदनशील प्रशासनाचे प्रतीक आहे. शिवराज, तुम्ही कुंटूर सर्कलमध्ये जोमाने तयारी सुरू करा; प्रतापराव, मला काही अडचण नाही — तुम्हालाही नसावी,” असे सांगून त्यांनी वातावरणात उमेदवारीच्या घोषणेसारखीच उत्सुकता निर्माण केली.
“नायगाव, उमरी आणि धर्माबादमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस निश्चित विजयी होईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. “कार्यकर्त्यांची एकजूट म्हणजेच पक्षाची खरी ताकद”
जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर
“राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्वसामान्य माणसाच्या न्यायासाठी लढणारा पक्ष आहे. आपल्या कामातून, प्रामाणिकपणातून आणि जनसेवेच्या निष्ठेतून आपण जनतेचा विश्वास संपादन केला पाहिजे,” असे आवाहन होटाळकर यांनी केले.
ते म्हणाले, आगामी निवडणुकांमध्ये आपण एकदिलाने काम करून नायगाव, उमरी आणि धर्माबादमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवू. गावागावात जाऊन संघटन मजबूत करा, लोकांच्या समस्या ऐका आणि त्यांच्या अडचणींवर उपाय सुचवा. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्रीपती शिंदे मांजरमकर यांनी प्रभावीपणे केले.

