ताज्या बातम्यानांदेड

श्री रेणुकामातेच्या गडावर भाविकांमध्ये तुंबळ हाणामारी ; मंदिर प्रशासनाच्या निष्क्रियतेवर गंभीर प्रश्नचिन्ह; भाविकांमध्ये प्रचंड संताप!.

श्रीक्षेत्र माहूर : जयकुमार अडकिने

श्री रेणुकादेवी मंदिर परिसरामध्ये दिवाळीच्या सुट्ट्यांदरम्यान मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होत असताना, शुक्रवारी अचानक झालेल्या तुंबळ हाणामारीमुळे गडावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या घटनेमुळे मंदिर प्रशासन, अशासकीय विश्वस्त मंडळ आणि स्थानिक व्यवस्थापन यांच्या कार्यक्षमतेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.                                         माहितीनुसार, अशासकीय विश्वस्तांच्या नातेवाईकांकडून मंदिराच्या सभामंडपात विशेष पूजा सुरू असताना भाविकांचा प्रचंड जमाव दर्शनासाठी रांगेत उभा होता. पुजेच्या दरम्यान सात ते आठ जणांना आत प्रवेश दिल्यामुळे सामान्य भाविकांना दर्शनासाठी तासन्‌तास उभं रहावं लागलं. याबाबत नाराजी व्यक्त करणाऱ्या काही भाविकांनी विरोध दर्शविताच, वाद वाढत जाऊन हाणामारीपर्यंत पोहोचला.     भाविकांचा आरोप आहे की मंदिर प्रशासनातील काही व्यक्ती आणि विश्वस्तांच्या नातलगांकडून पूजेला विशेष वागणूक दिली जाते. त्यामुळे सामान्य भाविकांना थांबावं लागतं. प्रशासन मात्र या अन्यायाकडे दुर्लक्ष करत आहे

असं काही स्थानिकांनी सांगितलं.

हाणामारीच्या घटनेत काही भाविक जखमी झाले असून, एका भाविकाचा हात फ्रॅक्चर, तर दुसऱ्याला अटॅक आल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेचे पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.                                  गेल्या नवरात्रात प्रशासनाने ४२० पोलिस कर्मचारी, साडेतीनशे सुरक्षा रक्षक आणि विविध विभागांचे अधिकारी गडावर तैनात केले होते. त्यावेळी भाविकांच्या सुरक्षेसाठी एक मार्ग बंद करण्यात आला होता, परंतु त्यामुळे व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला होता. यंदा दिवाळीच्या गर्दीत मात्र सुरक्षा बंदोबस्ताचा पूर्णतः अभाव दिसून आला.                                                 आता मंदिर परिसरातच भाविकांमध्ये हाणामारी झाल्याने, मंदिर प्रशासन, सुरक्षा व्यवस्था आणि अशासकीय विश्वस्त मंडळाच्या निष्क्रियतेवर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

स्थानिक भाविकांच्या मते  गेल्या ११ वर्षांपासून मंदिर प्रशासन भाविकांना सुरक्षित वातावरण देण्यात अपयशी ठरले आहे. व्यवस्थापक आणि विश्वस्त मंडळातील काही जण राजकीय छत्राखाली असल्याने कारवाई होत नाही, असा आरोप भाविकांनी केला आहे. भाविक व सामाजिक संघटनांकडून जिल्हा प्रशासनाने तातडीने चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!