
नायगाव : बाळासाहेब पांडे
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड आयोजित ‘ज्ञानतीर्थ युवकमहोत्सव २०२५’ नुकताच ग्रामीण तंत्र निकेतन, नांदेड येथे उत्साहात पार पडला. या स्पर्धेत नायगाव येथील शरदचंद्र महाविद्यालयाचा गुणी विद्यार्थी हरीप्रसाद बाळासाहेब पांडे (मांजरमकर) याने तबला वादनात प्रथम तर शास्त्रीय तालवाद्य प्रकारात द्वितीय क्रमांक मिळवून महाविद्यालयाचे आणि तालुक्याचे नाव उज्वल केले
हरीप्रसाद हा प्रसिद्ध तबलावादक आणि ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब पांडे यांचा कनिष्ठ चिरंजीव असून, त्याने तबला वादनाचे प्राथमिक धडे वडील बाळासाहेब पांडे, संगीत शिक्षक नामदेव पांचाळ, शंकर बिरादार आणि संजय देशपांडे यांच्याकडून घेतले. पुढे त्याला तालसम्राट प्रशांत गाजरे (तळवलकर गुरुजींचे पटशिष्य) यांचे सखोल मार्गदर्शन लाभले. ग्रामीण पार्श्वभूमीत वाढूनही हरिप्रसादने आपल्या अभ्यासू वृत्ती, सातत्य आणि मेहनतीच्या जोरावर ‘तबला अलंकार’ ही पदवी मिळवली आहे. गतवर्षी लातूर येथील दयानंद महाविद्यालयात झालेल्या युवक महोत्सवातही त्याने यश संपादन करून आपले संगीत कौशल्य सिद्ध केले होते. हरिप्रसादच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष खा. रविंद्र पाटील चव्हाण, सचिव केशवराव पाटील चव्हाण, प्राचार्य डॉ. बलभीम वाघमारे, उपप्राचार्य डॉ. श्याम पाटील, तसेच सेवानिवृत्त प्राचार्य हरिबाबू ,सर्व प्राध्यापक कर्मचारी यांनी त्याचे मन:पूर्वक अभिनंदन केले आहे.
या स्पर्धेत प्रा. डॉ. गो. रा. परडे व प्रा. मनिषा पांगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाच्या आठ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. हरीप्रसादच्या या यशाबद्दल सर्वत्र त्याचे अभिनंदन होत असून, त्याच्याकडून आगामी काळात अजून मोठ्या यशाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

