ताज्या बातम्यानांदेडनायगाव

समाजहिताच्या रक्षणात पोलिस व पत्रकारांची भूमिका समान ;  सोशल मीडियाने सजग पत्रकारिता केल्यास ती आदर्श ठरेल* – उपविभागीय पोलिस अधीक्षक श्याम पानेगावकर.

नायगाव :

समाजाच्या हितासाठी पोलिस व पत्रकार हे दोन्ही घटक सारखीच महत्त्वाची भूमिका बजावत असून, पत्रकारितेच्या बदलत्या प्रवाहात केवळ प्रिंट मीडियाच नव्हे तर सोशल मीडियानेही सजग व जबाबदार पावले उचलणे आवश्यक आहे. समाजहिताला केंद्रस्थानी ठेवून केली जाणारी पत्रकारिता ही आदर्श ठरेल आणि तीच पत्रकारिता जनतेच्या मनाला भावणारी ठरेल, असे प्रतिपादन उपविभागीय पोलिस अधीक्षक श्याम पानेगावकर यांनी केले.

ते पत्रकार दिनानिमित्त आयोजित पत्रकार गौरव सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

व्हॉईस ऑफ मीडिया, तालुका व शहर शाखा नायगाव यांच्या वतीने दि. ६ जानेवारी रोजी जनता हायस्कूल येथील स्व. माजी आ. बळवंतराव चव्हाण सभागृह, नायगाव येथे हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाचे उद्घाटन कुंटूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल भोसले यांच्या हस्ते झाले.

यावेळी व्यासपीठावर सेवानिवृत्त प्राचार्य रमेश कदम, साहित्यिक व व्याख्याती प्रा. राजेश्वरी कदम, व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब पांडे, ज्येष्ठ पत्रकार माधव मामा कोकुर्ले, शेख वहाबुद्दीन, भा. ग. मोरे सर, प्रा. डॉ. शंकरराव गडमवार, जिल्हा आरोग्य विभागाचे अध्यक्ष शिवाजी पनासे, तालुका अध्यक्ष गंगाधर ढवळे, पोर्टल विंगचे जिल्हा कार्याध्यक्ष पवनकुमार पुठेवाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

समाजहितासाठी ग्रामीण पत्रकारांचे योगदान मोलाचे – सौ. राजेश्वरी कदम

कार्यक्रमात “समाजहितासाठी पत्रकारांचे योगदान” या विषयावर प्रा. राजेश्वरी कदम यांचे प्रभावी व्याख्यान झाले.

त्या म्हणाल्या, ग्रामीण भागातील जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य पत्रकार करीत असून, समाज घडवण्यात ग्रामीण पत्रकारांचे योगदान अनमोल आहे. दर्पण या पहिल्या मराठी वृत्तपत्रामुळे महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवली गेली, असे त्यांनी नमूद केले.

पत्रकाराने आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली नाही, तर समाज दिशाहीन होतो. म्हणूनच पत्रकाराची लेखणी ही निर्भीड, सजग व जबाबदार असली पाहिजे, असे त्या म्हणाल्या. शासनाच्या योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचतात की नाही, यावर लक्ष ठेवण्याचे काम पत्रकार करतो. महिला सुरक्षा असो वा ग्रामीण विकास – सर्वच क्षेत्रांत पत्रकारांची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

विशेष सत्कार या वेळी व्हॉइस ऑफ मीडिया,

जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब पांडे यांची मराठवाडा साहित्य मंडळ यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय बाळशास्त्री जांभेकर या पुरस्कारा साठी निवड झाल्या बद्दल मंडळाचे जिल्हाध्यक्ष रणजीत गोनारकर,साहित्य संमेलनाचे आयोजक जीवन मांजरमकर यांच्या हस्ते निवडीचे पत्र देऊन सत्कार तर नायगाव तालुका अध्यक्ष गंगाधर ढवळे यांना उत्कृष्ट तालुका अध्यक्ष – २०२५ पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल तसेच नांदेड पोर्टल विंगचे जिल्हा कार्याध्यक्ष पवनकुमार पुठेवाड यांना मिळालेल्या राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराबद्दल संघटनेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला                या वेळी उद्घाटक स.पो.नी.विशाल भोसले, जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब पांडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुका कार्याध्यक्ष बालाजी नागठाणे, सचिव वसंत जाधव, शहर अध्यक्ष शिवाजी कुंटूरकर, शहर कार्याध्यक्ष अरविंद शिंदे यांच्यासह तालुक्यातील पत्रकार बांधवांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमास व्हॉईस मिडियाचे ५० च्या वर शिलेदार उपस्थित होते .यावेळी नुकतेच निधन झालेले पत्रकार मित्र सुभाष पेरकेवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

व्हॉईस ऑफ मिडिया च्या सर्व पत्रकाराचा पेन डायरी पुष्प देऊन सत्कार करण्यात आला याच वेळी स्व.पत्रकार रामप्रसाद चनावार यांचे स्मरणात त्यांचे बंधू लक्ष्मण चनावार यांनी ही पेन, डायरी ,व दिनदर्शिका देऊन सर्वांचा सन्मान केला .सूत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस (साप्ताहिक विंग) प्रकाश भाऊ हणमंते यांनी केले, तर आभार डिजिटल मिडिया तालुका अध्यक्ष संभाजी वाघमारे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!