
जयकुमार अडकिने
माहूर- भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाच्या वतीने दि. ०४ जानेवारी २०२६ रोजी माहूर तालुका कॉंग्रेस पक्षाची पक्षबांधणी व आढावा बैठक प्रदेश प्रवक्ते तथा युवक कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष बालाजी गाढे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सदर बैठकीत माहूर तालुका युवक कॉंग्रेस ची धुरा सचिन बेहेरे व शहराध्यक्ष पदाची धुरा प्रा. सलमान काजी यांच्या खांद्यावर देण्यात आली.
कॉंग्रेस पक्षातील घराणेशाही व मनसबदारी चालविणारे काही लोक पक्षाला सोडचिट्ठी देऊन भाजपात गेल्याने पक्षाचे एकनिष्ठ व सर्वसामान्य कार्यकर्ते आजही पक्षात टिकून असून त्यांना काम करण्याची संधी देण्याचा योग आम्हाला लाभला असल्याने कुठलाही राजकीय वारसा नसलेले सर्वसामान्य कार्यकर्ते सचिन बेहेरे यांना तालुका युवक कॉंग्रेसची धुरा सोपविली असल्याचे यावेळी बालाजी गाढे पाटील यांनी सांगितले.
सचिन बेहेरे हे बालपणापासूनच कॉंग्रेस पक्षाच्या विचाराने प्रभावित होते. मतदानाचा अधिकार प्राप्त झाला तेव्हापासूनच त्यांनी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन पक्षाचे काम तळा गळापासून केले. त्यामुळेच अतिशय संघर्ष करून त्यांनी पक्षातील युवक कॉंग्रेस उपाध्यक्ष पद मिळवून त्या माध्यमातून गेल्या १० वर्षापासून पक्ष विरोधी पक्षात बसलेला असतांना सुद्धा निष्ठापूर्वक भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचा किनवट माहूर विधानसभा मतदार संघात तळागाळात पोहचलेला विचार जिवंत ठेवण्याचे कार्य केले. याचीच पावती म्हणून युवक कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष बालाजी गाढे पाटील यांनी त्यांना युवक कॉंग्रेस तालुकाध्यक्ष पदावर नियुक्ती देऊन नेतृत्व करण्याची संधी उपलब्ध करून दिली. तसेच माहूर शहरात प्राध्यापक असलेल्या उच्चशिक्षित युवक प्रा. सलमान काजी यांची नियुक्ती करून नेतृत्व करण्याची संधी दिली.
प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ जिल्हाध्यक्ष राजेश पावडे, युवक कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांच्या मान्यतेने दोन्ही युवा कार्यकर्त्यांना नियुक्ती देण्यात आली. सदर नियुक्तीमुळे माहूर तालुका व शहरातील कॉंग्रेस प्रेमी जनतेत उत्साहाचे वातावरण पसरले आहे. यावेळी ओबीसी सेल प्रदेश सचिव मोहन राठोड, जिल्हा उपाध्यक्ष किसनराव राठोड तालुकाध्यक्ष आनंद पाटील तुपदाळे, संग्राम देशमुख, आकाश गिरी, अल्पसंख्यांक सेल जिल्हा उपाध्यक्ष जबार भाई, नगरसेवक प्रतिनिधी राजु सौंदलकर, जेष्ठ कार्यकर्ते गफारभाई, संजय गायकवाड, जयकुमार अडकीने, माणिकराव पाटील वायफनीकर, सिद्धार्थ तामगाडगे, शरीफ भाई, शेख मन्नान, शेख साद्दिकभाई आदीसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. या नियुक्ती बद्दल सचिन बेहेरे व प्रा. सलमान काजी यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. कॉंग्रेस पक्षाच्या धर्मनिरपेक्ष विचारानुसार लवकरच सर्व जाती धर्मातील सर्वसामान्य युवकांना राजकीय प्रवाहात आणत त्यांना सोबत घेऊन युवक कॉंग्रेसची मजबूत फळी उभारण्यास येईल असे नवनियुक्त युवक कॉंग्रेस तालुकाध्यक्ष सचिन बेहेरे व शहराध्यक्ष प्रा. सलमान काजी यांनी यावेळी प्रसारमाध्यमाशी बोलतांना सांगितले.

