
माहूर : जयकुमार अडकिने

माहूर तालुक्यातील दतशिखर ते वझरा शेख फरीद दरगाह हा भाविकांच्या श्रद्धेचा आणि पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा मार्ग. परंतु गेल्या काही वर्षांपासून या रस्त्याची अवस्था प्रचंड दयनीय झाली असून दर आठवड्याला होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या रस्त्यामुळे आतापर्यंत लहानमोठे शेकडो अपघात घडले असून परिसरातील अनेक ग्रामस्थ व भाविक जखमी झाले आहेत. अनेकांचे जीव गेले आहेत.
या गंभीर परिस्थितीची दखल घेत सामाजिक कार्यकर्ते मनोज मुकुंद कीर्तने यांनी माहुर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंत्यांना निवेदन देत प्रशासनाला कडक इशारा दिला आहे.
सद्यस्थिती अत्यंत भयावह — रस्त्यावर मोठ्या प्रमाणात डांबर उखडून गेल्याने लांब खड्डे, घाटात मुरूम दगड आणि अरुंद वळणं यातून जीवघेणा प्रवास करावा लागतो.
दतशिखर घाटापासून अनेक ठिकाणी प्रचंड खोल खड्डे व चररेषा पडले असून दगड-खडी बाहेर आल्याने दुचाकी व चारचाकी वाहनांना संतुलन ठेवणे कठीण झाले आहे. अनेक वळणांवर दगडसरी व झाडे कोसळण्याचा धोका कायम असून स्थानिक व पर्यटकांना जाण्यासाठी सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या रस्त्यावर जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो.
भाविकांचे जीव धोक्यात; पर्यटनावरही मोठा परिणाम
सुफी संत शेख फरीद दरगाह हे माहूर परिसरातील अत्यंत पवित्र स्थान आणि ऐतिहासिक तथा पर्यटनासाठी विहंगम धबधबा आहे. तसेच दररोज हजारो लोकांची बाजारपेठ व दवाखान्यासाठी माहूर या ठिकाणी ये जा आहे.माहूर या तालुक्याच्या ठिकाणाला अनेक गावच्या लोकांना हा एकमेव मार्ग आहे.हा रस्ता केवळ दुरुस्ती नाही तर, लोकांच्या जीवित्वाचा आणि या भागातील संवेदनशील विषय आहे.एक महिन्यात दुरुस्त करा ही मागणी आहे. प्रशासन सिरियस घेते की वेळकाढू पना करते हे पाहणे जनहिताच्या दृष्टीने महत्वाचे आहे.

