
नायगाव :
इकळी माळ येथे रामनवमी उत्सवानिमित्त गुरुवार, दिनांक २६ रोजी भव्य यात्रा व किर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. या सोहळ्यास उमरी येथून भव्य पायी दिंडी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
यावेळी हरिभक्त परायण समाधान महाराज भाजेकर यांच्या वाणीतून सकाळी १० वाजता रामजन्माचे कीर्तन होणार असून त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सुमारे २५ हजारांहून अधिक भाविक उपस्थित राहतील, या दृष्टीने मंदिर समितीकडून नियोजन करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री मंदिर समितीचे अध्यक्ष राजेश कुंटूरकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन यात्रा, दर्शन व्यवस्था व महाप्रसाद वाटपाबाबत सविस्तर नियोजन करण्यात आले. भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी समिती व ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आहे.
दरम्यान, गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरू झालेल्या अखंड हरिनाम सप्ताहात अनेक नामवंत कीर्तनकारांनी सहभाग नोंदवला आहे. शुक्रवारी सकाळी १० वाजता ह.भ.प. सोपान महाराज शास्त्री यांच्या अमृतवाणीतून काल्याचे कीर्तन होणार असून महाप्रसाद वाटपाने कार्यक्रमाची सांगता करण्यात येणार आहे.
या उत्सवामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे व भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.


