ताज्या बातम्याधार्मिकनांदेड

रेणुका देवी संस्थानच्या परिसरात भाविकांच्या अपघातानंतर तातडीने बॅरिकेटिंगची व्यवस्था.

माहूर- जयकुमार अडकीने

29 मे रोजी मध्यरात्री 2 वाजता श्री रेणुका देवी गडावर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या वाहनाला अपघात झाला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु या घटनेमुळे गडावर सुरक्षिततेबाबतचे प्रश्न पुन्हा ऐरणीवर आले आहेत. अपघात घडून गेल्यानंतर दुसऱ्याच दिवशी श्री रेणुका देवी संस्थानच्या प्रशासनाने तत्काळ त्या ठिकाणी बॅरिकेट्स लावण्याची व्यवस्था केली.

सध्या गडावर स्कायवॉकचे काम सुरू असल्यामुळे जागेची कमतरता निर्माण झाली आहे. परिणामी भाविकांना एकाच पायरीच्या मार्गाने गडावर जावे लागते. परशुराम मंदिराकडून जाणारा मार्ग काही तांत्रिक अडचणींमुळे तात्पुरता बंद करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे बायपास मार्गावरही काम सुरू असल्याने तो देखील वापरात नाही. त्यामुळे गडावर जाणे आणि उतरणे यासाठी एकमेव मार्गच खुला असल्यामुळे शनिवार-रविवारसारख्या गर्दीच्या दिवशी खूपच अडचणी निर्माण होत आहेत. नियोजनाच्या अभावामुळे भाविकांची मोठी गैरसोय होत आहे. वाहन व्यवस्थापन, गडावरील गर्दीचा ओघ, सुरक्षा व्यवस्था यावर समर्पक नियंत्रण नसल्याचे चित्र आहे. विशेषतः अपघात घडून गेल्यानंतर लगेच प्रशासनाने बॅरिकेट्स लावण्याची तत्परता दाखवली असली तरी, हीच खबरदारी अपघात होण्याच्या आधी घेतली असती तर तो टळू शकला असता. यामुळे प्रशासनाच्या पूर्वतयारीवर आणि नियोजनक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.                  या पार्श्वभूमीवर श्री रेणुका देवी संस्थानचे प्रभारी व्यवस्थापक यांनी समुपदेशन व मार्गदर्शन करणारे कर्मचारी वाढवून व्यवस्था सुधारण्याचे प्रयत्न करणे गरजेचे आहे. भाविकांची वाढती गर्दी, चालू असलेली कामे, तसेच मार्ग मर्यादित असल्यामुळे भविष्यात कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून अधिक काटेकोर उपाययोजना करणं अत्यावश्यक आहे. गेल्या सात वर्षांपासून प्रभारी व्यवस्थापक देवस्थानचा कारभार पाहत आहेत, अशासकीय विश्वस्त मंडळ अद्याप पर्यंत बरखास्त आहे.या पार्श्वभूमीवर राजपत्रित आणि जबाबदार व्यवस्थापकांची नेमणूक करण्याची मागणी भाविकांकडून होऊ लागली आहे.

भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने स्कायवॉकचे काम पूर्ण होईपर्यंत गडावरील हालचालींचे योग्य नियोजन, मार्गदर्शन केंद्रांची उभारणी, आणि सततची देखरेख अत्यावश्यक ठरत आहे. अपघातानंतर घेतलेल्या पावलांनी संस्थानच्या तत्परतेचा परिचय दिला असला तरी, भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी ही तत्परता पूर्वसंधीपासूनच दाखवणे आवश्यक आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!