
माहूर – जयकुमार अडकीने
ग्रामीण भागातील नागरिकांना प्रथमोपचार सुविधा मिळण्यासाठी शासनामार्फत प्राथमिक आरोग्य केंद्रे व त्या अंतर्गत उपकेंद्रे स्थापन केली व आरोग्य केंद्रासाठी व उपकेंद्रासाठी कोट्यावधी रुपये निधी मंजूर करून भव्यदिव्य इमारती उभारल्या व आरोग्य कर्मचारी नियुक्त करून ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे औदार्य दाखविले. परंतु काही कामचुकार कर्मचारी शासनाच्या या उद्दात हेतुलाचा हरताळ फासत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसत असून आरोग्य कर्मचारी दोन तीन तास भेट देण्याची औपचारिकता पार पाडत असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवा मिळणे कठीण झाले आहे.
या बाबत सविस्तर असे की, वाई बा. प्रा. आ. केंद्रा अंतर्गत असलेल्या मदनापूर उपकेंद्राअंतर्गत मदनापूर, सायफळ, व करळगाव या गावांचा समावेश असून मौजे मदनापूर येथे आरोग्य उपकेंद्राची कोट्यावधी रुपये खर्चून उभारण्यात आलेली आयुषमान आरोग्य मंदिर ही इमारत तोऱ्यात उभी आहे. परंतु या आरोग्य केंद्रात नियुक्ती असलेले वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी कुणीही येथे सहा महिन्यापासून वास्तव्यास नसल्याची बाब समोर आली आहे. या आरोग्य उपकेंद्रात नियुक्ती असलेल्या आरोग्य सेविका श्रीमती एस. बी. राठोड ह्या त्यांच्या मनमर्जीने दिवस भरात तास दोन तास आरोग्य उपकेंद्रात हजर राहत असून त्या माहूर येथून अप डाऊन करत तर आरोग्य सेवक सुमित सुर्यवंशी हे यवतमाळ येथून अपडाऊन करत कर्तव्य बजावत असल्याने मदनापूर आरोग्य उपकेंद्राअंतर्गत नागरिकांना आरोग्य सेवे पासून वंचित राहावे लागत आहे. तालुका आरोग्य अधिकारी यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष द्यावे अशी आरोग्य प्रेमी नागरिकातून मागणी होत आहे.
याबाबत वाइ बा. प्रा. आ. केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आडे यांना कळविले असता संबधित कर्मचारी यांना लेखी पत्र देऊन कळवितो असे गेल्या सहा महिन्यापासून सांगत आहेत परंतु परिस्थितीत काहीही बदल झालेला नाही.
शासनाने नागरिकांच्या आरोग्य सुविधेसाठी कोट्यावधी रुपये खर्च केला असला तरी आरोग्य कर्मचाऱ्याच्या कामचुकार पणामुळे व दिन जाव तनखा आव धोरणा मुळे नागरिकांना आरोग्य सुविधेपासून वंचित राहावे लागत आहे. – देवन्ना मल्लेलवार शिवसेना उबाठा शाखा प्रमुख मदनापूर @@@

