
नायगाव : पांडे बाळासाहेब
नायगाव तालुक्याच्या कृषी विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा कोलंबी उपसा सिंचन प्रकल्प अखेर पूर्णत्वास आला असून, बळेगाव-घुगराळा डी.सी. चेंबरपर्यंत पाणी पोहोचल्याने प्रकल्पाच्या यशस्वीतेवर शिक्कामोर्तब झाले आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हा प्रकल्प साकार झाल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, आर्थिक समृद्धीच्या नव्या पर्वाची सुरुवात होणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
नांदेड जिल्ह्यातील गोदावरी नदीवरील विष्णुपुरी प्रकल्पाशी संलग्न असलेल्या या योजनेद्वारे बळेगाव येथून जलवाहिनीद्वारे पाणी नायगाव परिसरातील शेतीपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. यासाठी सुमारे ३० किलोमीटर लांबीची जलवाहिनी उभारण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे नायगाव तालुक्यातील जवळपास १० हजार एकर क्षेत्र ओलिताखाली येणार असून सुमारे ३४ ते ३५ गावांतील शेतकऱ्यांना त्याचा थेट लाभ होणार आहे.
पावसाच्या लहरीपणामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना दरवर्षी संकटांचा सामना करावा लागत होता. सिंचनाच्या अभावामुळे पीक उत्पादनावर परिणाम होत होता. मात्र आता वर्षभर पाण्याची उपलब्धता निर्माण झाल्याने दुबार-तिबार पिके घेणे शक्य होणार असून उत्पादनवाढीसह शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सिद्धार्थ इन्फ्राटेक प्रा. लि. या कंपनीमार्फत प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यात आले. प्रकल्प गुत्तेदार मयूर पाटील, कार्यकारी अभियंता बन्सोड तसेच कनिष्ठ अभियंता दूधगावकर यांनी प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी विशेष योगदान दिल्याचे सांगितले जात आहे.
शासनाच्या आदेशानंतरच पाणी वितरण
प्रकल्पाच्या सद्यस्थितीबाबत उपविभागीय अभियंता अरुण आणकुलवार व गुत्तेदार मयूर पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, “डी.सी. चेंबरपर्यंत पाणी पोहोचले आहे. प्रकल्पाची चाचणी पूर्ण झाली असून
काही ठीकाणी वाल खोलून ठेवल्याने पाणी लीकिज काढून सध्या शेतकऱ्यांना जनावरे पाणी पिण्यासाठी देण्यात येणार आहे. शासनाकडून अंतिम आदेश प्राप्त झाल्यानंतरच शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी देण्याबाबत निर्णय घेतला जाईल.” असे त्यांनी भ्रमण ध्वनीवर बोलताना सांगितले.
अनेक वर्षे रखडलेल्या या महत्त्वाकांक्षी योजनेचे काम पूर्ण झाल्याने नायगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. कृषी क्षेत्राच्या विकासासाठी हा प्रकल्प मैलाचा दगड ठरणार असून तालुक्याच्या आर्थिक प्रगतीलाही मोठी चालना मिळणार असल्याचे मत शेतकरी व्यक्त करीत आहेत.



