
नायगाव :
संत हे केवळ मार्गदर्शक नसून ते जीवनातील अंधार दूर करून योग्य दिशा दाखवणारे आई-वडिलांसारखे दीपस्तंभ आहेत, असे प्रभावी प्रतिपादन करत “तुम्ही संत मायबाप कृपावंत” या अभंगावर आधारित हरिभक्त परायण गाथामूर्ती चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांच्या कीर्तनाने नायगाव शहरातील भाविक मंत्रमुग्ध झाले.
वैकुंठवासी बापुदेव जोशी कोलंबीकर व शारदामाई बापुदेव जोशी कोलंबीकर यांच्या पुण्यस्मरणानिमित्त बेळगे नगर परिसरात आयोजित या कीर्तन सोहळ्यात देगलूरकर महाराजांनी संतांच्या कृपेचे, त्यांच्या ममतेचे आणि भक्तांवरील अपार प्रेमाचे अत्यंत हृदयस्पर्शी विवेचन केले.
“तुम्ही संत मायबाप कृपावंत” या अभंगातील ‘मायबाप’ या संकल्पनेचा उलगडा करताना महाराजांनी सांगितले की, जसे आई-वडील आपल्या लेकरांवर निस्वार्थ प्रेम करतात, तसेच संतही संपूर्ण जगावर अखंड कृपा करतात. त्यांच्या सहवासात राहिल्यास माणसाच्या जीवनात सद्गुणांची वृद्धी होते आणि जीवनाला योग्य दिशा मिळते. यावेळी त्यांनी व्याकरणाच्या अनेक कोट्यांद्वारे अभंगातील आशय अधिक प्रभावीपणे स्पष्ट केला.
कीर्तनादरम्यान संत परंपरेचे महत्त्व, नामस्मरणाची ताकद आणि सदाचाराचे मूल्य यांवर विशेष भर देण्यात आला. अभंगातील प्रत्येक ओळीचा सोप्या आणि ओघवत्या भाषेत अर्थ समजावून सांगत देगलूरकर महाराजांनी उपस्थितांच्या मनात भक्तीभाव जागवला.
या प्रसंगी पंचक्रोशीतील गायक, वादक, कलावंत तसेच नायगाव शहर व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कीर्तनाच्या शेवटी सर्वांनी एकमुखाने नामस्मरण करत परिसर भक्तीमय केला.
कार्यक्रमाचे आयोजन हरिदेव, मुकुंददेव, कीर्तनकार वासुदेव बापुदेव जोशी कोलंबीकर व परिवार यांच्या वतीने करण्यात आले होते. तसेच कीर्तनात पारमार्थिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या भक्तांचा विशेष सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास हरिभक्त परायण बाबू महाराज काकाडीकर, चंदू महाराज लाठकर, श्रीधर महाराज कासराळीकर, योगेश महाराज बेटमोगरेकर, आलेवार महाराज, विष्णू महाराज यांच्यासह अनेक नामवंत कीर्तनकार उपस्थित होते. तसेच हणमंत पाटील चव्हाण, शिवराज पाटील होटाळकर, पंकज पाटील चव्हाण, लक्ष्मण ठकरवाड, बाबुराव लंगडापुरे, टाळकरी, मृदंगवादक व ब्राह्मण मंडळींचाही यावेळी सत्कार करण्यात आला.उपस्थित व्यक्ती बद्दल ऋण हरि भक्त परायण वासुदेव महाराज यांनी व्यक्त केले.कार्यक्रम यशस्वितेसाठी विश्वेश्वर जोशी,धन्य Dnyaneshwar जोशी,त्यांचा पूर्ण जोशी परिवार व मित्र मंडळी यांनी प्रयत्नकेले…


