
मुक्रामाबाद येथील 40 म्हशी दगावलेल्या शेतकऱ्याला कवळे गुरुजींनी आपल्या व्याही असलेल्या राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांच्याकडे मदत करण्याची केली मागणी.
मुखेड तालुक्यातील मुक्रामाबाद येथील बालाजी शंकरअप्पा खंकरे शेतकऱ्याच्या बांधलेल्या गोठ्यात 40 म्हशी 04 गिरगांई, अचानक आलेल्या महापुरामुळे काही म्हशी मृत्युमुखी पडल्या तर काही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या. इतकेच नव्हे तर शेतकऱ्याचा कष्टाने बांधकाम करुन उभारलेला बांधीव गोठादेखील पाण्याच्या तडाख्यामुळे कोसळून नष्ट झाला. या अनर्थामुळे शेतकरी कुटुंब अक्षरशः उघड्यावर आले असून, त्यांचे जगणेच कठीण झाले आहे.
या परिस्थितीत हतबल झालेल्या शेतकऱ्याने सामाजिक कार्यकर्ते आणि शेतकरी नेते कवळे गुरुजींना आर्त हाक दिली. परिस्थितीची गंभीरता समजताच कवळे गुरुजी तातडीने मदतीसाठी पुढे सरसावले. कोणतेही पद नसतानाही शेतकऱ्यांच्या वेदना कमी करण्यासाठी सदैव तत्पर राहणाऱ्या कवळे गुरुजींनी तत्काळ पुढाकार घेतला.
यावेळी कवळे गुरुजींनी आपल्या व्याही असलेल्या राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांना दूरध्वनी द्वारे संपूर्ण घटनेची माहिती दिली. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, जनावरांची हानी तसेच गोठ्याचे संपूर्ण उद्ध्वस्त होणे याबाबत सविस्तर वृत्तांत मंत्री आबा पाटील यांच्यासमोर मांडले.
शेतकऱ्यांचे हाल ऐकून मकरंद आबा पाटील यांनी मदतीचे आश्वासन दिले. शेतकऱ्याच्या हाती लवकरच शासनाकडून आवश्यक ती आर्थिक मदत पोहोचवली जाईल, तसेच पुनर्वसन विभागाकडून योग्य पावले उचलली जातील, असेही त्यांनी सांगितले.
.

