
नायगाव :
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या समाधान शिबीर अभियान टप्पा १ संदर्भात नायगाव तहसील कार्यालयात तहसीलदार अनन्या रेड्डी यांनी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली. शासनाच्या निर्देशानुसार महसूल विभागामार्फत नागरिकांच्या विविध प्रलंबित कामांचा तातडीने निपटारा करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र शासनाच्या १८ फेब्रुवारी २०२६ च्या शासन निर्णयानुसार तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार या अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. नागरिकांना महसूल विभागाशी संबंधित विविध प्रश्नांचे निराकरण एका ठिकाणी करण्यासाठी समाधान शिबिरे आयोजित केली जाणार आहेत.
परिविक्षाधिन तहसीलदार अनन्या रेड्डी यांनी सांगितले की, या अभियानाच्या माध्यमातून ७/१२ उतारा, फेरफार, वारस नोंद, जमाबंदी दुरुस्ती, नामांतरण, जमीन विषयक प्रलंबित प्रकरणे, तसेच महसूल विभागाशी संबंधित इतर सेवा नागरिकांना सुलभपणे उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या अडचणी मांडाव्यात व शासनाच्या या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तलाठी, मंडळ अधिकारी तसेच महसूल विभागातील संबंधित कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या असून तालुक्यातील सर्व गावांमध्ये याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.असे पत्रकार परिषद
मध्ये सांगितले.या वेळी नायब तहसीलदार विजय येरावाड,पेशकार डहाळे मॅडम हे उपस्थित होते.
परिविक्षाधिन तहसीलदार अनन्या रेड्डी म्हणाल्या…
“छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत आयोजित समाधान शिबिरांमुळे महसूल विभागातील अनेक प्रलंबित प्रश्न एकाच ठिकाणी सोडविणे शक्य होणार आहे. नागरिकांनी शिबिरात सहभागी होऊन आपल्या समस्या मांडाव्यात व शासनाच्या या उपक्रमाचा लाभ घ्यावा.”


