
कुंटूर :
कुंटूर परिसरात गेल्या काही तासांपासून जिओचे मोबाइल नेटवर्क व्यवस्थित कार्यरत नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद असून मोबाईल कॉल लागत नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नेटवर्क बंद पडल्यामुळे ऑनलाइन व्यवहार, बँकिंग सेवा तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक काम मोठ्या प्रमाणात प्रलंबित झाले आहे. काही ठिकाणी महत्त्वाचे कॉलही लागत नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
याबाबत संबंधित कंपनीने तात्काळ दखल घेऊन नेटवर्क सेवा सुरळीत करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. स्थानिकांनी सांगितले की, या समस्येमुळे अनेकांचे दैनंदिन कामकाज ठप्प झाले असून लवकरात लवकर नेटवर्क सेवा पूर्ववत करणे आवश्यक आहे.


