
नायगाव : बाळासाहेब पांडे
नांदेड–हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावरील नायगाव शहरातील अतिवर्दळीचा डॉ. हेडगेवार चौक गेल्या काही महिन्यांपासून मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांसाठी अक्षरशः डोकेदुखी ठरत होता. या खड्ड्यांमुळे अपघातांची मालिका सुरू असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असतानाच, काही तांत्रिक अडचणींमुळे तब्बल पाच दिवस बंद पडलेले खड्डे बुजवण्याचे काम अखेर पुन्हा एकदा मोरे यांना शब्द दिल्या प्रमाणे १५ मे तारखेला जोमाने सुरू करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, या चौकातील धोकादायक परिस्थितीकडे सातत्याने लक्ष वेधणाऱ्या कै. बळवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष भा. ग . मोरे यांच्या पाठपुराव्यानंतर संबंधित यंत्रणा पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे.
शुक्रवारी सकाळपासून जेसीबी, मनुष्यबळ आणि डांबरी साहित्याच्या सहाय्याने खड्डे बुजवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.नायगाव शहराचा मुख्य प्रवेशमार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या चौकातून दररोज हजारो लहान-मोठी वाहने, प्रवासी बस, रुग्णवाहिका तसेच शेतकरी व व्यापारी वर्गाची सतत वर्दळ असते. मात्र रस्त्यावर पडलेल्या खोल खड्ड्यांमुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता. विशेषतः दुचाकीस्वार आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. पावसाळ्यापूर्वीच रस्त्याची दुरवस्था गंभीर बनल्याने नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या.
दरम्यान, ऑपरेटर च्या घरी आजोबा बिमार असल्याने व दुसरा लग्नाच्या अडचणीत असल्याने काम बंद होते.काम बंद झाल्याने काहींनी अपप्रचार केला तर ,नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली होती.
मात्र संबंधित विभागाकडून काही तांत्रिक अडचणीमुळे काम बंद आहे येत्या १५ मे ला काम चालू करणारच असा शब्द मोरे यांना कामावरील अभियंता सतीश कुमार यांनी दिला असल्याचे मोरे यांच्याकडून सांगण्यात आले होते. अखेर त्या अडचणी दूर झाल्यानंतर कामाला पुन्हा सुरुवात झाल्याने नागरिकांनी काही प्रमाणात समाधान व्यक्त केले आहे.
कै. बळवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष भा. ग. मोरे यांनी सांगितले की, “हेडगेवार चौकातील खड्ड्यांमुळे नागरिकांचे हाल होत होते. याबाबत सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. आता काम पुन्हा सुरू झाले असून ते दर्जेदार व कायमस्वरूपी व्हावे, हीच अपेक्षा आहे.”
नागरिकांनीही संबंधित विभागाने केवळ तात्पुरती मलमपट्टी न करता संपूर्ण रस्ता मजबूत दर्जाने तयार करावा, अशी मागणी केली आहे. अन्यथा काही दिवसांत पुन्हा खड्डे पडून परिस्थिती ‘जैसे थे’ होण्याची भीती ही अनेकांनी व्यक्त केली आहे.



