ताज्या बातम्यानांदेडनायगाव

कोलंबी जलउपसा सिंचन प्रकल्पात भ्रष्टाचाराचा ‘पूर’  ; निकृष्ट कामांमुळे शेतकरी संतप्त;नायगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचा १ जूनला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा.

नायगाव :बाळासाहेब पांडे

कोलंबी जलउपसा सिंचन प्रकल्पातील निकृष्ट व अपुऱ्या कामांविरोधात परिसरातील शेतकऱ्यांचा संताप अखेर उफाळून आला असून, प्रकल्पातील त्रुटी तात्काळ दूर करून कामे पूर्ण न झाल्यास येत्या १ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिला आहे.

राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक असलेल्या या प्रकल्पावर कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. मात्र अधिकाऱ्यांची कथित निष्काळजीपणा, कंत्राटदारांचा बोगस कारभार आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष यामुळे हा प्रकल्प अद्याप पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झालेला नाही, असा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, प्रकल्पाच्या सुरुवातीपासूनच अनेक अनियमितता झाल्या. कालवे, पाइपलाइन आणि जलवाहिनीची अनेक कामे अद्याप अपूर्ण अवस्थेत आहेत. अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आल्यामुळे वारंवार तांत्रिक बिघाड होत असून, सिंचनासाठी आवश्यक असलेला पाण्याचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होत असून जनावरांच्या पाण्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

विशेषतः बळेगाव ते घुंगराळा दरम्यान टाकण्यात आलेल्या पाइपलाइनच्या कामावर शेतकऱ्यांनी गंभीर आक्षेप घेतले आहेत. रायझिंग मेनसाठी वापरण्यात आलेले पाइप सातत्याने फुटत असल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात असून शेतांमध्ये पाणी साचून नुकसान होत असल्याची तक्रार करण्यात आली. संबंधित कंत्राटदाराने अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम केल्याचा आरोप करत वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासन दखल घेत नसल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

या पार्श्वभूमीवर निवासी उपजिल्हाधिकारी अजय शिंदे यांना आज निवेदन सादर करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे नायगाव तालुकाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत आंदोलनाचा इशारा दिला.

शेतकऱ्यांनी सांगितले की, हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यास गंगनबीड, रानसुगाव, तागबीड, पळसगाव, लालवंडी, हिप्परगा, अंचोली, कोलंबी आणि मांजरमसह सुमारे २५ गावांचा शिवार सिंचनाखाली येऊन परिसराचा कायापालट होऊ शकतो. मात्र भ्रष्टाचार आणि हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांच्या आशांवर पाणी फिरत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

यावेळी कांतराव निकपुरे, कैलास जाधव, संतोष जाधव, शिवानंद जाधव, गोविंद संग्रपवार, रणजीत जंगले, तिरुपती जाधव, प्रकाश जाधव, वसंत जाधव, शंकर जाधव, विठ्ठल जाधव, शिवहार जाधव, बालाजी जाधव आदी शेतकरी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!