
नायगाव
नरसी येथील पोलीस चौकीच्या आवारात बांधण्यात येत असलेल्या नूतन इमारतीची पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी आज दि. २ मे रोजी शुक्रवारी पाहणी केली. लोक सहभागातून सुरु असलेल्या या उपक्रमा बद्दल पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी यावेळी रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप यांच्या कार्य कुशलतेचे तोंड भरून कौतुकही केले.
नांदेड जिल्ह्यातील प्रमुख चौरस्त्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या नरसी तालुका नायगाव येथील फाट्यावर रामतीर्थ पोलिस ठाण्याची पोलीस चौकी कार्यरत आहे. या इमारतीचे देखील काही वर्षांपूर्वी सपोनि अशोक जाधव यांनी देखील लोक सहभागातूनच बांधकाम केले होते.
दरम्यान प्रशासकीय व विविध बंदोबस्त कामी येणारे वरिष्ठ अधिकारी तसेच इतर कार्यालयीन कामकाजासाठी येथे अजून एका सुसज्ज इमारतीची फार गरज होती. तीच गरज ओळखून चौकीच्या आवारात उपलब्ध असलेल्या मोकळ्या जागेत स.पो.नि. श्रीधर जगताप यांनी लोक सहभागातून नूतन इमारत निर्मिती साठी उल्लेखनीय पुढाकार घेतला आहे.
सध्या या नूतन इमारतीचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले असून दि.२ में रोजी शुक्रवारी हैद्राबादहुन नांदेड कडे जात असताना पोलीस अधीक्षक अबीनाश कुमार यांनी अचानकपणे नरसी पोलीस चौकीस भेट दिली व या नूतन उपक्रमाची पाहणी केली. या लोकोपयोगी कार्याबद्दल सपोनि श्रीधर जगताप यांच्या पुढाकाराचे त्यांनी विशेष कौतुकही केले.
यावेळी नायगांव येथील परिवक्षाधीन पोलीस उपाधीक्षक किरण पोपळघाट, पोलीस निरिक्षक सुभाषचंद्र मार्कड, सपोनि श्रीधर जगताप, पोलीस उपनिरीक्षक शिवराज नरवाडे यांची उपस्थिती होती.
येत्या काही दिवसात विशेष पोलीस उपमहानिरीक्षक नांदेड यांच्या हस्ते या नूतन इमारतीचे लवकरच लोकार्पण करण्यात येणार असून यावेळी पोलीस अधीक्षक अविनाश कुमार उपस्थित राहणार असल्याचे सपोनि श्रीधर जगताप यांनी सांगितले आहे. यावेळी रामतीर्थ व नायगाव ठाण्याचे पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

