ताज्या बातम्यानांदेड

जि.प.पं.स.निवडणुकांची चाहूल लागताच राजकीय नेते अॅक्टीव्ह मोडवर!.शिवसेना व राष्ट्रवादी चे चार पक्ष झाल्याने इच्छुकांना अनेक पर्याय उपलब्ध!.

नवीन प्रभाग रचनेत माहूर तालुक्यात ३ जि.प.गट व सहा पं.स. गण होण्याची शक्यता लखमापूर,वाई बा.व वानोळा (जि.प. गट संभाव्य) लखमापूर, हडसनी, वाई बा. गोंडवडसा,वानोळा व पापलवाडी (संभाव्य पं.स.गण)! .

राजकीय वार्तापत्र :- जयकुमार अडकीने

माहूर: सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर जि.प.पं.स सह स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांची चाहूल लागल्याने सर्वच राजकीय पक्षातील इच्छुक अॅक्टीव्ह मोड वर आल्याचे दिसत असून गेल्या साडेतीन वर्षापासून सातत्याने स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका प्रलंबित असल्याने जि.प. व पंचायत समितीवर प्रशासक राज आले. त्यामुळे कोणत्याही राजकीय नेत्याचा वचक नसल्याने अधिकारी व कर्मचारी यांची मनमानी वाढली होती. आता मात्र सर्वोच न्यायालयाने निवडणुका घेण्याचे निर्देश दिल्याने भ्रष्ट व मनमानी कारभाराला वैतागलेल्या सर्व सामन्य जनतेसह मिनी मंत्रालयात शिरकाव करण्याचा मनसुबा बाळगून गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असलेले प्रत्येकच पक्षातील नवे जुने सर्वच इच्छुकांत आनंदाचे वातवरण पसरले आहे.
लोकसभा व विधानसभा निवडणुकीत आपल्या पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचाराच्या निमित्याने जन संपर्क करून घेण्याचा फायदा घेतलेले सर्वच पक्षातील इच्छुक आपल्या निवडणुकीबाबत अनिश्चितता कायम असल्याने सतत जनसंपर्क ठेवणे हे जिकीरीचे व खर्चिक काम असल्याने तोलून मापून जनसंपर्कात होते. आता मात्र लवकरच निवडणुका घोषित होण्याची शक्यता निर्माण झाल्याने तालुक्यात राजकीय वातवरण ढवळून निघत आहे. भाजप, कॉंग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट, राष्ट्रवादी अजित पवार, शिवसेना शिंदे गट, शिवसेना उद्धव ठाकरे गट, माकप-भाकप, मनसे,एमआयएम, प्रहार जनशक्ती पक्ष, वंचित बहुजन आघाडी सह विविध राजकीय पक्षातील जि.प. गट, पं.स.गणात निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांनी जन संपर्कात वाढ केली असून लग्न समारंभ, व विविध मंगल कार्ये, तसेच मरण व तोरण दारी आवर्जून हजेरी लावत असल्याचे दिसत आहे. निवडणुका लांब असल्याने जनसंपर्काची अलर्जी बाळगून असलेलेही आता विनाअपील जनसंपर्कात गुंतल्याचे दिसत आहे. प्रभाग रचनेच्या आराखड्यानुसार माहूर तालुक्यात यावेळी लखमापूर, वाई बा. व वानोळा असे तीन जि. प. गट राहणार असून प्रत्येक जि.प. गटात दोन प्रमाणे लखमापूर जि.प. गटात लखमापूर, हडसनी, वाई बा. जि.प. गटात वाई बा., गोंडवडसा, वानोळा जि.प. गटात वानोळा, पापलवाडी, असे सहा प.स. अशी यापूर्वी नांदेड जिल्ह्यातील ७३ जि.प. गट व १४६ पं.स.गणाचा प्रारूप आराखडा अधिसूचना दि. २ जून २०२२ रोजी निघाली होती त्यात तालुक्यातील लखमापूर जि. प. गटात लखमापूर प.स. गण- लखमापूर, लखमापूर तांडा,जगू नाईक तांडा,आष्टा, कसळसिंग तांडा, शेकापूर, केरोळी, लांजी, लिंबायत, नेर, मालवाडा, मुरली, नखेगाव, टाकळी, पडसा, वडसा, उमरा, उमरा तांडा, हडसनी प.स. गण- हडसनी, रुई, गुंडवळ, गुंडवळतांडा, शेख फरीद वझरा,अजनी,आनमाळ,दत्तमांजरी,ईवळेश्वर, हिंगणी,दिगडी (कु.) ,तांदळा, ममतापूर, आदि ३१ गावे म्हणजेच २१ ग्रा.प. तर वाई जि.प. गटात वाई बा. प.स.गण- वाई बा., वाई बा.तांडा, मच्छिंद्र पार्डी,दासू नाईक तांडा, बंजारातांडा, गोंडेगाव, गोंडेगाव तांडा, सायफळ, कोळी, हरडफ, हरडफ तांडा,सावरखेड, बोंडगव्हाण, चौफुली, मदनापूर, करळगाव, गोंडवडसा पं.स. गणात – गोंडवडसा, गोंडवाडी, रामू नाईकतांडा, रुपा नाईक तांडा गोकुळनगर, करंजी,गंगाजीनगर,सेलू, लोकरवाडी, मनिरामथड, वसराम तांडा, सतिगुडा, गोंडखेडी, भगवती, वायफनी, सिंदखेड, निजामपेठ, अंजनखेड, नाईकवाडी, असे ३४ गावे म्हणजेच १९ ग्रा.प. तर वानोळा जि.प. गटात वानोळा पं.स. गण, वानोळा, वानोळातांडा, पाचोंदा, मेंडकी, मुंगशी, रामपूर,परसरामतांडा, बोरवाडी, भिमपूर, महादापूर, शिऊर,रायगड,कुपटी,पानोळा, पावनाळा, दिगडी धा., धानोरा दि., साकुर, दहेगाव, पापलवाडी पं.स. गणात पापलवाडी, हिवळणी, आसोली, आसोलीतांडा,मेट, कासारपेठ,सालंबी, तुळशी, मलकागुडा, मलकागुडातांडा, चोरड, जुनापाणी, भोरड,लसणवाडी, रुपला नाईकतांडा, मांडवा असे एकूण ३५ गावे म्हणजेच २२ ग्रा.प.चा गट गण निहाय समावेश असल्याचे जाहीर केलेल्या प्रारूप प्रभाग आराखडा घोषित करण्यात आला होता. त्याच आराखड्यानुसार निवडणुका घेण्यात येतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत असून आरक्षण सोडत नव्याने निघणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे निवडणूक लढविण्यास इच्छुक असणाऱ्या प्रत्येक पक्षातील इच्छुकांची घालमेल सुरु झाली असून आता आरक्षण सोडतीच्या प्रतीक्षेत आपण इच्छुक असलेला गट आरक्षित होऊ नये यासाठी देव पाण्यात ठेऊन बसलेले आहेत. आरक्षण सोडतीनंतरच प्रत्येक राजकीय पक्षाची रणनीती ठरणार असून त्यानंतरच राजकीय रंग भरण्यास सुरुवात होइल आणि तालुक्यात मिनी मंत्रालयाची रणधुमाळी जोरात सुरु होईल .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!