
नायगाव तालुक्यातील शेतकरी सध्या मोठ्या संकटात सापडले आहेत. यंदा दिनांक १३ जून रोजी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यावर विश्वास ठेवत अनेक शेतकऱ्यांनी घाईगडबडीत यंत्राच्या सहाय्याने ७० टक्क्यांहून अधिक क्षेत्रावर पेरणी केली.
मात्र, पेरणीनंतर वरुण राजा कोपल्याने एक थेंबही पाऊस न पडल्यामुळे जमिनी कोरड्या पडल्या आहेत. सूर्याच्या तीव्र तापामुळे पेरलेली सोयाबीनची पिके उघड्यावर सुकू लागली असून, शेतकऱ्यांचे डोळे पाणावले आहेत.विशेष म्हणजे यावर्षी सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ झाली असून, पारंपरिक कापसाच्या पीकांमध्ये घट झाली आहे. त्यामुळे बहुतांश शेतकरी सध्या सोयाबीन पेरणीकडे झुकले होते. आता मात्र याच पेरणीवर संकट कोसळले आहे.
“पाणी नाही, पाऊस नाही, पीक सुकतंय… आभाळाकडे डोळे लावून फक्त आशा शिल्लक आहे”, असं भावनिक वक्तव्य एका शेतकऱ्याने केले.काही शेतकरी आपल्या शेतातील सुकणाऱ्या पिकांकडे पाहत अश्रूंना वाट मोकळी करून देताना दिसून येत आहेत. तर काही जण पाण्याच्या प्रतीक्षेत शेताच्या बांधावर नजर लावून बसले आहेत. अशा स्थितीत जर लवकरच पावसाची हजेरी लागली नाही, तर दुबार पेरणी करण्याची वेळ येणार आहे. यामुळे शेतीची आर्थिक गणिते कोलमडण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.अगोदरच महाग बी खत घेऊन केलेली पेरणी पुन्हा पेरण्याची वेळ आली तर प्रशासनाने त्वरित परिस्थितीची दखल घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि मदतीची गरज आहे, अशी मागणी नायगाव तालुक्यातून होत आहे.

