
नायगाव:- बाळासाहेब पांडे
नायगाव तालुक्यातील तीर्थक्षेत्र असलेल्या कोलंबी येथील दरेगाव पाटी ते सरकारी रुग्णालयापर्यंत सुरू असलेले सुमारे ८०० मीटरचे सिमेंट रस्ता व नालीचे काम अतिशय निकृष्ट आणि बोगस दर्जाचे होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी न करता सार्वजनिक बांधकाम विभाग प्रकरण दडपविण्याचा प्रयत्न करीत असल्याने ग्रामस्थानी उपोषणाचा इशारा दिला आहे.
कोलंबी येथील दक्षिण बाजूने प्रवेशासाठी अतिशय महत्वाचं असलेला रस्ता म्हणजे दरेगाव पाटी ते कोलंबी गाव या रस्त्यावर सिमेंट रस्ता काम संबंधित गुत्तेदार अंदाजपत्रकातील तरतुदींप्रमाणे न करता दर्जा हीन आणि नियमबाह्य पद्धतीने काम करत असून, याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागनायगाव यांच्याकडे चौकशीची मागणी करण्यात आली आहे.
सदर कामासाठी एक कोटींहून अधिक निधी मंजूर झाला असून, कामास सुरुवात होऊन एक वर्षाचा वर कालावधी उलटूनही अद्याप संथगतीने हे कामसुरू आहे.
रस्ता कोलंबी गावासाठी अत्यंत महत्त्वाचा असून, रुग्णालय व दरेगाव पाटीशी संपर्काचा मुख्य मार्ग आहे. मात्र, सध्याच्या कामावरून ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे.
१६ जून रोजी तक्रार सादर करूनही विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे, ग्रामस्थांनी आता बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे. या संदर्भात कोलंबी येथील अनिल बैस, देविदास बैस, नागेश दुलेवाड, रामा गोलेवार, पांडुरंग सोनमनकर, शादूल शेख, रमेश टोकलवाड, गोविंद बुरपल्ले यांच्यासह ८८ नागरिकांच्या स्वाक्षरीसह निवेदन देण्यात आले आहे.
“गुत्तेदाराने अंदाजपत्रकाच्या तरतुदींप्रमाणे दर्जेदार काम न केल्यास, आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू,” असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. सार्वजनिक पैशाचा गैरवापर होत असताना प्रशासनाची दुर्लक्षीत भूमिका अंगाला झणझणीत चपराक असल्याचे मतही यावेळी संतप्त नागरिकांनी आमच्या प्रतिनिधी जवळ बोलताना व्यक्त केले.

