
माहूर : जयकुमार अडकिने
माहूर तालुक्यातील बँकेच्या कर्जदार शेतकऱ्याच्या पिक कर्जाची सक्तीने वसुली करण्याच्या उद्देशाने शेतकऱ्यांच्या बँक खात्याला बँकेने होल्ड लावले असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक व्यवहार खोळंबले आहेत. अनेक शेतकऱ्यांचे आपल्या शाखेतील बँक खात्यात पंतप्रधान आवास योजना, पंतप्रधान किसान सन्मान योजना व विविध शासकीय अनुदानाच्या रक्कम वर्ग होतात. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी या करिता शासन स्तरावर मागणी सुरु असून शेतकऱ्यांचे बँक खात्यांना लावलेले होल्ड काढणे आवश्यक आहे. तसेच एपीएस सुविधा बंद असल्याने तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना व शेतकऱ्यांना बँक खात्यातील पैसे काढण्याकरिता शेतातील कामे व रोजगारांची कामे बुडवून खर्च करून यावा लागतो तेव्हा एपीएस सुविधा तात्काळ सुरु करणे आवश्यक आहे.
बँक कर्मचाऱ्याकडून ग्राहकांना विशेषतः शेतकरी ग्राहकांना उद्धर पणाची वागणूक मिळते त्यास आळा घालून बँक कर्मचाऱ्यांना ग्राहक व शेतकरी ग्राहकांना सौजन्य पूर्ण वागणूक देण्याबाबत सूचना देणे आवश्यक आहे. सदरील मागण्याची तात्काळ दखल घेऊन विषय तात्काळ निकाली काढण्यात यावे अन्यथा दि.२८/०७/२०२५ रोजी आपल्या शाखेसमोर समनक जनता पार्टी माहूर च्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येईल अशा इशारा समनक जनता पार्टी माहूर च्या वतीने तहसीलदार माहूर यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनावर समनक जनता पार्टी चे माहूर तालुकाध्यक्ष प्रा. रवी राठोड, अरविंद राठोड, प्रल्हाद राठोड, रमेश जाधव, विश्वजीत राठोड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

