
माहूर – जयकुमार अडकिने
सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या माहूरगडावर सध्या भक्तिभाव, उत्साह आणि अध्यात्माचा संगम पाहायला मिळत आहे. श्री दत्तात्रेय संस्थान, दत्तशिखर, माहूरगड येथे परमपूज्य श्री श्री १००८ महंत मधुसूदन भारती महाराज यांच्या अध्यक्षतेखाली अखंड दत्त नाम सप्ताह आणि पंचकोशी परिक्रमा यात्रेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.
हा धार्मिक सोहळा ३ ऑगस्ट २०२५ (रविवार) रोजी श्रावण शुक्ल नवमीपासून सुरुवात झाला असून, १० ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी काकड आरतीने मंगलमय सांगता होणार आहे.
नारळी पौर्णिमेचे विशेष आकर्षण – पंचकोशी परिक्रमा
या सप्ताहातील सर्वांत मोठे आकर्षण म्हणजे नारळी पौर्णिमा व रक्षाबंधनाच्या निमित्ताने ८ ऑगस्ट २०२५ (शुक्रवार) रोजी काढण्यात आलेली पंचकोशी परिक्रमा यात्रा. दुपारी ४ वाजता दत्तशिखर मंदिरातून या यात्रेला प्रारंभ झाला. यापूर्वी श्री दत्त महाराजांची पूजन-विधीपूर्वक आरती करण्यात आली. सर्व तीर्थस्थानांहून पवित्र तीर्थ आणून दत्त महाराजांचा अभिषेक करण्यात आला. त्यानंतर परमपूज्य श्री श्री १०८ महंत मधुसूदन भारती महाराज यांच्या आशीर्वादाने यात्रेला शुभारंभ झाला.
संस्थानच्यावतीने भाविकांना दुपारी ३ वाजेपर्यंत दत्तशिखर येथे हजर राहण्याचे आवाहन करण्यात आले होते, ज्यास मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळाला.
परिक्रमा मार्ग
पंचकोशी परिक्रमा यात्रेत पुढील तीर्थस्थळांचा समावेश होता सर्वतीर्थ, कमंडलू कुंड, कालेश्वर महादेव, सयामाता, गरुडगंगा, मातृतीर्थ तलाव, विष्णुपद मठ, झंपटनाथ कालभैरव, माहूर मारोती मंदिर, कपीलेश्वर मंदिर, सोनापीर, कवठापीर मंदिर, पांडव लैणी, भीमतीर्थ, आनंद मठ पुरुषोत्तम भारती, चंचल महाराज मठ (चहापाणी व्यवस्था), बद्रिका आश्रम, दैवदैवश्वरी मंदिर, जुना वझरा मार्ग, कैलास टेकडी (जुना कैलास पायथा), शेख फरीद, वझरा मारोती, ग्रामदेवता (दत्तमांजरी वाडा), अमृतेश्वरी कुंड, अनुसया माता, रेणुका माता आणि शेवटी दत्तशिखर मंदिर येथे परिक्रमेची सांगता झाली.
भक्तांची लाखोंची गर्दी : या यात्रेदरम्यान माहूरगडावर लाखो भाविकांची उपस्थिती होती. परिसरात ‘दत्त जयजयकार’ आणि ‘जय अनुसया माते’च्या घोषणांनी वातावरण दुमदुमले होते. भक्तांनी विविध वेशभूषा, पताका आणि पालख्या घेऊन यात्रेत सहभाग घेतला. सह्याद्री पर्वत भक्तांनी गजबुजून गेला होता.
प्रशासनाचा कडक बंदोबस्त लाखोंच्या गर्दीचा विचार करून प्रशासनाच्या वतीने कडक सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला. वाहतूक व्यवस्था, वैद्यकीय सुविधा, पाणीपुरवठा आणि स्वच्छतेची व्यवस्था उत्तमप्रकारे पार पाडली गेली.
मान्यवरांची उपस्थिती : दत्तशिखर येथील मुख्य पुजारी वासुदेव महाराज, चिंतन महाराज, ऋषिकेश जोशी, रवी जोशी तसेच दत्तशिखरवरील साधू-संत, संस्थानातील असंख्य कर्मचारी व स्वयंसेवक यांनी यात्रेच्या यशस्वी आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावली.
या सोहळ्यामुळे माहूरगड परिसरात भक्ती, श्रद्धा आणि आनंदाचा दरवळ पसरला आहे. नारळी पौर्णिमा आणि पंचकोशी परिक्रमेच्या निमित्ताने झालेले हे आयोजन भाविकांच्या मनात दीर्घकाळ स्मरणात राहील.

