
माहूर : जयकुमार अडकिने
माहूर आगारातील एका एसटी बस चालक व वाहकाच्या उद्धट वर्तनामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. ही घटना २१ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ३.१५ च्या सुमारास माहूर बसस्थानकाजवळ घडली.
गजानन कुलकर्णी (जिल्हा उपाध्यक्ष, मनसे नांदेड) यांनी दिलेल्या निवेदनानुसार, ते आपल्या वृद्ध आईला तातडीच्या उपचारासाठी माहूर येथून पुसद येथे घेऊन जाण्यासाठी कुटुंबासह बसची वाट पाहत होते. त्याचवेळी माहूर–पुसद मार्गावरील बस स्थानकातून सुटत होती. प्रवाशांनी बस थांबवण्याचा प्रयत्न केला असता चालकाने बस थोडी थांबवली, मात्र वाहक (बॅच क्रमांक ४७५३) यांनी तत्काळ घंटी वाजवून चालकाला बस पुढे नेण्यास सांगितले.
या वेळी प्रवाशांनी विनंती केली असता वाहकाने उद्धटपणे “मागून दुसरी गाडी येत आहे” असे सांगून बस न थांबवता पुढे नेली. यामुळे वृद्ध आणि आजारी महिलेसह कुटुंबातील प्रवाशांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागला.
श्री. कुलकर्णी यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे की, चालक (बेंच क्रमांक १२३०) व वाहक यांचे हे वर्तन प्रवासी सेवेला विरोधी असून एसटी महामंडळाच्या प्रतिमेला धक्का पोहोचवणारे आहे. त्यांनी या दोन्ही कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करून तात्काळ निलंबन करण्याची मागणी केली आहे.
या संदर्भात त्यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक व माहूर तसेच पुसद आगार व्यवस्थापकांकडे निवेदन पाठविले असून प्रवासी सुरक्षेला व सेवेला प्राधान्य देत तातडीने चौकशी करून कठोर पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.
स्थानिकांमध्येही या घटनेबद्दल संताप व्यक्त केला जात असून “एसटी प्रवासी हीच खरी ताकद आहे, त्यामुळे चालक–वाहकांनी सेवाभाव ठेवला पाहिजे,” अशी भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

