
माहूर : जयकुमार अडकिने
किनवट–माहूरचे जननायक, दिवंगत माजी आमदार स्व. प्रदीपजी हेमसिंग नाईक यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त आज दिनांक १ जानेवारी रोजी दहेली तांडा येथे आयोजित अभिवादन कार्यक्रमास हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. “मरावे परी कीर्ती रूपी उरावे” या उक्तीचा प्रत्यय यावेळी आला.
स्व. प्रदीप नाईक हे जाती–पाती, धर्मभेद व राजकीय मतभेदांच्या पलीकडे जाऊन सर्वसामान्यांशी आपुलकीने नाते जोडणारे लोकनेते होते. समाजकारणातून राजकारण करणारे, कुणालाही न दुखावता जनतेचे प्रश्न सोडवणारे आणि विरोधकांनाही सन्मान देणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती.
प्रथम पुण्यस्मरणानिमित्त स्व. प्रदीपजी नाईक स्मृतीस्थळ, दहेली तांडा येथे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी त्यांच्या सामाजिक व राजकीय कार्याचा गौरव करत आठवणींना उजाळा दिला. संदीप पाल महाराज यांच्या समाजप्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन यावेळी करण्यात आले होते.
तसेच स्व. माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या पुण्यतिथीनिमित्त सरफराज दोसानी यांनी प्रकाशित केलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. या अभिवादन कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील मान्यवर, कार्यकर्ते तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
स्व. प्रदीप नाईक यांचे कार्य, विचार आणि जनतेशी असलेली नाळ आजही तितक्याच ताकदीने लोकांच्या मनात जिवंत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

