
माहूरचे शिक्षक मोहम्मद युनूस कुरेशी राष्ट्रीय उर्दू शिक्षक पुरस्काराने सन्मानित..!
माहूर : जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, माहूर येथील उपकर्मशील शिक्षक मोहम्मद युनूस कुरेशी यांना राष्ट्रीय स्तरावरील उर्दू शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दिल्ली कौमी उर्दू शिक्षक कर्मचारी संघाच्या वतीने गालिब अकॅडमी येथे राष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. शिक्षण आणि साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या देशभरातील शिक्षक व प्राध्यापकांचा या सोहळ्यात गौरव करण्यात आला. या कार्यक्रमास संघाचे अध्यक्ष चौधरी बासील अली यांच्या नेतृत्वाखाली देशभरातील उर्दू शिक्षक, प्राध्यापक, साहित्यिक व विद्वान उपस्थित होते. महाराष्ट्रातून केवळ तीन शिक्षकांची निवड करण्यात आली होती, ज्यामध्ये माहूर येथील मोहम्मद युनूस कुरेशी यांचा समावेश असल्याने नांदेड जिल्ह्याचा मान उंचावला आहे. स्थानिक स्तरावरही कुरेशी सरांच्या या यशाबद्दल समाधान व्यक्त होत असून शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचा गौरव होत असल्याचे मत विविध ठिकाणांहून व्यक्त केले जात आहे.

