
नायगाव : बाळासाहेब पांडे फोटो
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत नायगाव तालुक्यातील कोलंबी ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक पटकावत विकासकामांच्या माध्यमातून आपला ठसा उमटविला आहे. ग्रामविकास, स्वच्छता, लोकसहभाग, पारदर्शक प्रशासन आणि विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीच्या जोरावर कोलंबी ग्रामपंचायतीने हा मान मिळविला आहे.
राज्य शासनाच्या वतीने दि. 17 सप्टेंबर 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविण्यात आले होते. ग्रामीण भागातील विकासाला चालना देणे, ग्रामपंचायतींची कार्यक्षमता वाढविणे आणि नागरिकाभिमुख प्रशासनाला प्रोत्साहन देणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश होता. या कालावधीत कोलंबी ग्रामपंचायतीने विविध विकासकामे, स्वच्छता उपक्रम, ग्रामसुविधा विस्तार, नोंदवही व्यवस्थापन, महसूल वाढ आणि शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून उल्लेखनीय कामगिरी बजावली.
अभियानाच्या तालुकास्तरीय मूल्यमापनासाठी अहिल्यानगर येथील तज्ज्ञ पथकाने कोलंबी गावाला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी ग्रामपंचायतीने केलेल्या विकासकामांची तपासणी करण्यात आली तसेच ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय नोंदी, आर्थिक व्यवहार, योजनांची अंमलबजावणी आणि लोकसहभाग यांचे सखोल मूल्यमापन करण्यात आले.
पाहणीदरम्यान पथकाने गावातील विविध विकासकामे, स्वच्छता व्यवस्था, सार्वजनिक सुविधा आणि ग्रामस्थांचा सहभाग याबाबत समाधान व्यक्त केले. ग्रामपंचायतीच्या कामकाजातील शिस्तबद्धता, पारदर्शकता आणि नियोजनबद्ध कार्यपद्धतीचेही पथकाने कौतुक केले.
यावेळी ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे तालुकाध्यक्ष तथा कोलंबी ग्रामपंचायत अधिकारी टी. जी. रातोळीकर यांच्या कार्यपद्धतीचे विशेष कौतुक करण्यात आले. ग्रामपंचायतीच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी केलेले प्रयत्न, योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी घेतलेली मेहनत आणि ग्रामस्थांना सोबत घेऊन केलेले नियोजन यामुळे कोलंबी ग्रामपंचायतीला हा मान मिळाल्याचे मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
कोलंबी ग्रामपंचायतीला मिळालेल्या या यशाबद्दल
ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, विविध समित्यांचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण असून, गावाच्या विकासासाठी भविष्यातही अशाच पद्धतीने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात येत आहे. तालुक्यात प्रथम क्रमांक मिळाल्याने कोलंबी ग्रामपंचायतीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असून इतर ग्रामपंचायतींसाठीही हा आदर्श ठरणार आहे.



