
नायगाव :
नायगाव शहरात प्रथमच महिलांच्या पुढाकारातून भगवान परशुराम जयंती साजरी करण्यात येत असून, सामाजिक बांधिलकी जपत दरवर्षीप्रमाणे विविध घटकांना सहभागी करून घेण्याचा उपक्रम यंदाही सुरू ठेवण्यात आला आहे. यावर्षी विशेष उपक्रम म्हणून पतीच्या दुःखद निधना नंतर आपल्या कुटुंबाची जबाबदारी हिमतीने सांभाळत कष्टातून संसार चालवणाऱ्या नायगाव शहरातील एकल कष्टकरी महिलांचा शोध घेऊन त्यांचा भगवान परशुराम जयंती निमित्ताने सन्मान करण्यात येणार आहे.
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, नायगाव शाखा महिला आघाडीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात समाजातील दुर्लक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न यातून केला जात आहे. विशेषतः पतीच्या निधनानंतर प्रतिकूल परिस्थितीत धुणीभांडी धुण्याचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या महिलांचा यावेळी सन्मान केला जाणार आहे.
यापूर्वीही नायगाव ब्राह्मण महासंघाने विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले आहेत. एसटी वाहक व चालकांचा सन्मान, पाणपोई उभारणे, परिचारिका व महिला पोलिस कर्मचारी यांचा गौरव, हातगाडी चालक व रिक्षाचालकांचे विमा उतरविणे,झोपडपटी मध्ये राहणाऱ्या कुटुंबा सोबत किट्स वाटप करून जयंती साजरी करणे,तसेच चर्मकार बांधवांना उन्हाळ्यात मोठ्या छत्र्यांचे वाटप अशा विविध माध्यमातून समाजातील कष्टकरी घटकांना सन्मानित केले आहे.
हे सर्व उपक्रम ब्राह्मण महासंघाचे जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) बाळासाहेब पांडे यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने राबवले जात असून, समाजात एकात्मता व सहकार्याची भावना वाढीस लागावी हा यामागील उद्देश आहे.यंदाच्या परशुराम जयंतीनिमित्त महिलांनी पुढाकार घेतला असून या होणाऱ्या या उपक्रमामुळे समाजात सकारात्मक संदेश जाईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
भगवान परशुराम व महात्मा बसवेश्वर जयंती संयुक्तरीत्या आज
दिनांक १९ एप्रिल रोजी भगवान परशुराम व महात्मा बसवेश्वर जयंती सायंकाळी पाच वाजता संयुक्त रित्या श्यामल कुलकर्णी यांचे निवासस्थान नृसिंह निवास गजानन नगर नायगाव येथे साजरी होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सुनीता प्रदीप कुलकर्णी सुजलेगावकर या राहणार असून,प्रमुख मार्गदर्शिका म्हणून प्रसिद्ध कीर्तनकार ताराताई बोमनाळे या उपस्थित राहणार आहेत.प्रमुख अतिथी म्हणून यमुनाबाई प्राथमिक विद्यालय नायगाव च्या मुखाध्यापिका सुनंदा बाळासाहेब पांडे ,मां.अध्यापिका उज्वलाबाई बालाजी नागठाणे, नरसी येथील प्रसिद्ध उद्योजिका सानिका प्रदीप जोशी,रोहिणी संदीप गुरू नरसीकर यांची उपस्थिती लाभणार आहे.या कार्यक्रमास महिला वर्गांनी उपस्थिती लावावी असे आवाहन महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा श्यामल श्याम कुलकर्णी यांनी केले आहे.



