
नायगाव : बाळासाहेब पांडे
शाश्वत विकास आणि समाजपरिवर्तनाच्या प्रक्रियेत युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून जबाबदार व संवेदनशील विद्यार्थी घडविण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना (NSS) हे प्रभावी व्यासपीठ आहे, असे प्रतिपादन शरदचंद्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. डी. इंगले यांनी केले.
शरदचंद्र महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष वार्षिक शिबिराचे उद्घाटन दि. 27 जानेवारी 2026 रोजी मौजे परडवाडी येथे संपन्न झाले. उद्घाटनप्रसंगी डॉ. इंगले मार्गदर्शन करत होते. हे विशेष शिबिर दि. 26 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे.
उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुंटूर मार्केट कमिटीचे माजी संचालक तसेच महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. गो. रा. परडे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून भौतिकशास्त्र विभाग प्रमुख सौ. डॉ. शकुंतला शिंदे, गणित विभाग प्रमुख डॉ. अमितकुमार पांडे, गावच्या सरपंच सौ. संगीता गोविंदराव परडे, ग्रामपंचायत अधिकारी श्री. सदाशिव आगलावे, चेअरमन नारायण पा. कराले, श्री. रामराव पा. बोरकर, श्री. वसंत पा. परडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी डॉ. शकुंतला शिंदे व डॉ. अमितकुमार पांडे यांनीही आपले मनोगत व्यक्त करत “शाश्वत विकासासाठी युवक : जलसंधारण व्यवस्थापन आणि ओसाड भूमी विकास” या विषयावर सखोल विचार मांडले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी प्रा. एम. एस. कदम यांनी केले. त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेची उद्दिष्टे स्पष्ट करत या विशेष शिबिरात राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक, पर्यावरणीय व जनजागृतीपर उपक्रमांची माहिती दिली तसेच स्वयंसेवकांना सक्रिय सहभागाचे आवाहन केले.
अध्यक्षीय समारोपात डॉ. गो. रा. परडे यांनी युवक हे समाज व राष्ट्रविकासाचे प्रमुख घटक असून NSS च्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान, नेतृत्वगुण व जबाबदारीची जाणीव निर्माण होते, असे मत व्यक्त केले.
या प्रसंगी गावचे भूमीपुत्र प्रा. बालाजी वाघमारे यांना पी.एच.डी. प्राप्त केल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वयंसेविका कु. वैष्णवी व कु. पुनम यांनी केले, तर आभार प्रदर्शन नोडल अधिकारी प्रा. साईगणेश यादव यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. पी. डी. तावडे, गावकरी शेषराव पाटील कराले, मारोती वाघमारे, प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. संपूर्ण कार्यक्रम प्रेरणादायी व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

