
नायगाव : बाळासाहेब पांडे
नरसीहून नांदेडकडे जाणाऱ्या भरधाव कारने पायी चालणाऱ्या तरुणाला जोरदार धडक दिल्याने तो जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी (दि. १७) रात्री आठच्या सुमारास घडली. ही घटना कृष्णूर एमआयडीसी परिसरातील नायरा पेट्रोल पंपाजवळ घडली. अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव दत्तप्रसाद माधव बैलकवाड (वय २२, रा. शेळगाव छत्री) असे आहे. तो एमआयडीसी परिसरातील उद्योगात कामाला होता. शुक्रवारी रात्री कामावरून परतताना तो ट्रॅव्हल्स वाहनातून उतरून पायी जात असताना ही घटना घडली. दरम्यान, एमएच-२६ बीसी-६०२६ क्रमांकाच्या कारने भरधाव वेगाने येत दत्तप्रसादला जोरदार धडक दिली, ज्यामुळे तो जागीच ठार झाला. धडक इतकी जबरदस्त होती की घटनास्थळीच त्याचा मृतदेह काही फूटांवर फेकला गेला. सदर कार नरसीहून नांदेडकडे जात असल्याचे समजते. घटनेनंतर कारचालक घटनास्थळावरून पसार झाला असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मृत दत्तप्रसाद हा अविवाहित होता. त्याच्या आकस्मिक निधनाने शेळगाव छत्री गावात शोककळा पसरली आहे. शनिवारी सकाळी शवविच्छेदन करून त्याचे पार्थिव शेळगाव छत्री येथे अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आले.

