
नायगाव 

नायगाव तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्येचे व कृषीप्रधान असलेले मांजरम गाव आता विकासाच्या नव्या टप्प्यावर आले आहे. गावातील तरुण मंडळी आणि ग्रामपंचायत यांच्या प्रयत्नांतून रविवारी आठवडी बाजार भरविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार दि. १९ ऑक्टोबर रोजी या बाजाराचा शुभारंभ गुरू श्री १०८ महंत यदुबन महाराज कोलंबीकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
ग्रामस्थांना भाजीपाला व इतर आवश्यक वस्तूंसाठी नायगाव, मुखेड, कंधार आदी ठिकाणी जावे लागत होते. त्यामुळे गावातच बाजार भरावा, अशी ग्रामस्थांची दीर्घकाळची मागणी होती. अखेर ग्रामपंचायत व युवकांच्या एकत्रित प्रयत्नांनी हा उपक्रम साकार झाला. या बाजाराच्या प्रचारासाठी सोशल मिडिया, प्रिंट मिडिया, पत्रके आणि लाऊडस्पीकरच्या माध्यमातून नायगाव, मुखेड, कंधार तालुक्यात जोरदार प्रसार करण्यात आला. शुभारंभाच्या वेळी ग्रामपंचायत कार्यालय मांजरमतर्फे व्यापारी वर्गासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्यात आली. बाजारात सहभागी व्यापाऱ्यांचा व आगंतुक मान्यवरांचा हार, शाल व फराळ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास नायगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव संजय कदम, पोलिस उपनिरीक्षक गणपत पेंदे, पोलिस हेडकॉन्स्टेबल शिंदे, ग्रामविकास अधिकारी यादवराव सूर्यवंशी, सरपंच रुक्मिणीबाई शिंदे, उपसरपंच शिला विठ्ठल शेट्टेवाड, पोलिस पाटील जयराज शिंदे, माजी सरपंच शोभाबाई माली पाटील, माजी उपसरपंच बालाजी माली पाटील ,यासह ग्रामस्थ,युवक वर्ग, आदी मान्यवर उपस्थित होते. गावातील युवकांनी केलेल्या या उपक्रमामुळे मांजरम परिसरातील सामाजिक आणि आर्थिक चैतन्य पुन्हा जागृत झाले आहे. ग्रामस्थांनी आता बँक शाखा, शासकीय कार्यालय, पोलिस ठाणे आणि कृषी उत्पन्न बाजार समितीची उपशाखा गावात आणण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवण्याची गरज आहे.

