
नायगाव : बाळासाहेब पांडे
दिवाळीच्या मंगलमुहूर्तावर देगाव (ता. नायगाव) येथील १११ जेष्ठ नागरिकांना वयोश्री योजनेअंतर्गत कृत्रिम अवयव व सहायभूत साधनांचे वाटप करण्यात आले. समाजसेवेची भावना जोपासत, या उपक्रमाचा पुढाकार देगाव ग्रामपंचायतीचे सरपंच आणि प्रसिद्ध दंतरोगतज्ज्ञ डॉ. दत्ता मोरे यांनी घेतला. गुडघेदुखी, पाठदुखी, चालता न येणे, श्रवणदोष अशा विविध व्याधींनी त्रस्त असलेल्या जेष्ठ नागरिकांना या कृत्रिम अवयवांचा मोठा आधार मिळाला आहे. ऑपरेशन न करता चालण्यायोग्य व दैनंदिन जीवन सुसह्य करणारी १६ प्रकारची उपकरणे या उपक्रमातून वितरित करण्यात आली. यात काठी, श्रवणयंत्र, पाठीचा व गुडघ्याचा पट्टा, वॉकर, ब्रेकसह घडीची खुर्ची, कमोड खुर्ची, सिलिकॉन कुशन, मानेचा पट्टा, कोपरा काठी यांसारख्या साधनांचा समावेश होता. या उपक्रमासाठी डॉ. मोरे यांनी गावातील जेष्ठ नागरिकांची यादी तयार करून ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ अंतर्गत केंद्र सरकारकडून सहाय्य उपलब्ध करून घेतले. रविवारी झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेतकरी शेतमजूर पंचायतचे राज्याध्यक्ष बळवंतराव मोरे होते. यावेळी ग्रामपंचायत सदस्य रावसाहेब मोरे, रावण भंडरवाड, ग्रामसेवक मोहनराव अडकीने, माजी सरपंच उत्तम मोरे, वयोश्री योजनेचे कर्मचारी राजकिशोर, साईनाथ घोडके, संतोष घोडके, ज्ञानेश्वर कह्राळे, राहूल गायकवाड, शुभम भद्रे, रामराव चव्हाण, किशोर मोरे, संभाजी मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. या योजनेच्या यशस्वितेसाठी ग्रामपंचायत अधिकारी मोहनराव अडकीने, लिपिक योगेश पुयड, सेवक सलमान पठाण, अमीर पठाण आणि सुधाकर मामा यांनी परिश्रम घेतले. जेष्ठ नागरिकांना सहायभूत साधने मिळाल्याने त्यांनी समाधान व कृतज्ञता व्यक्त केली. “जेष्ठांचा सन्मान म्हणजे खऱ्या अर्थाने दिवाळीचा प्रकाश”, असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले. डॉ. मोरे यांच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

