
जयकुमार अडकिने 
माहूर – महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री रेणुकामाता मंदिर येथिल दानपेट्यांची मोजदात करण्यात आली. नवरात्रोत्सव आणि दीपावलीच्या सुट्टीत भाविकांनी केलेल्या उदंड दानातून तब्बल 66 लाख 12 हजार 49 रुपये, 187 ग्रॅम सोने, आणि दोन किलो चांदीच्या वस्तू अशी संपत्ती संस्थानला प्राप्त झाली आहे.
ही माहिती संस्थानचे व्यवस्थापक योगेश साबळे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली.
मुख्य मंदिरातील चार आणि परिसरातील सात दानपेट्या उघडल्या
बुधवार, दि. ५ नोव्हेंबर रोजी संस्थानचे सचिव तथा सहाय्यक जिल्हाधिकारी जेनित चंद्रा दोन्तूला, कोषाध्यक्ष तथा तहसीलदार अभिजीत जगताप, पुजारी चंद्रकांत भोपी, संजय काण्णव, अरविंद देव, दुर्गादास भोपी आणि व्यवस्थापक योगेश साबळे यांच्या उपस्थितीत श्री रेणुकादेवी मंदिरातील चार दानपेट्या उघडण्यात आल्या.
या दानपेट्यांमधून भाविकांनी दिलेली ₹40,74,609 रोख रक्कम, 187 ग्रॅम सोने आणि दोन किलो चांदीच्या वस्तू मिळाल्या. याशिवाय, मंदिर परिसरातील श्री महालक्ष्मी मंदिर, श्री तुळजाभवानी मंदिर, श्री भगवान परशुराम मंदिर तसेच इतर ठिकाणांवरील सात दानपेट्या उघडण्यात आल्या. या सात दानपेट्यांमधून ₹25,37,440 इतकी रक्कम प्राप्त झाली. एकूण प्राप्ती 60 लाखांहून अधिक ; मुख्य मंदिर आणि परिसरातील सर्व दानपेट्यांमधून एकत्रितरित्या ₹60लक्ष,12,049 इतके दान मिळाले आहे. मात्र, सहा नंबर दानपेटीतील काही रक्कम पावसामुळे भिजल्याचे समजते. त्या रकमेबाबतची अचूक माहिती संस्थानकडून अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. या संदर्भात पुढील कारवाई कोणावर होईल, याकडे भाविकांचे लक्ष लागले आहे.
देणगी विभाग आणि इतर उत्पन्न दि. २२ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत संस्थानच्या देणगी विभागात रोख, क्रेडिट कार्ड व धनादेशाद्वारे ₹60,96,908 इतकी रक्कम प्राप्त झाली.
याशिवाय, पातळ विक्रीतून ₹17,24,940 इतके उत्पन्न मिळाले. ; देणगी विभागामार्फत 36 ग्रॅम 679 मिली सोन्याचे दागिने आणि 1 किलो 566 ग्रॅम 520 मिली चांदीचे दागिने भाविकांनी दान केले आहेत.
संस्थान प्रशासनाचे आवाहन संस्थानचे प्रभारी व्यवस्थापक योगेश साबळे यांनी सांगितले की, “भाविकांनी श्रद्धेने दिलेले हे दान पारदर्शकपणे वापरण्यासाठी संस्थान वचनबद्ध आहे. सर्व रक्कम व दागिन्यांची नोंद व्यवस्थित ठेवण्यात आली असून, शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पुढील कारवाई करण्यात येईल.”

