
श्रीक्षेत्र माहूर : जयकुमार अडकिने
स्वतंत्र सेनानी व प्रगतिशील विचारवंत टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त माहूर शहरात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून उत्साहमय वातावरणात जयंती साजरी करण्यात आली. विविध सामाजिक संघटना, युवक गट व सर्वधर्मीय नागरिकांनी मिरवणुकीत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
जयंतीनिमित्त सकाळी शहरातील टिपू सुलतान चौकात अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर टी-पॉईंटपर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत ढोल-ताशे पथक, बॅनर, झेंडे, ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांचे फलक, तसेच सामाजिक ऐक्य व राष्ट्रीय एकतेचे संदेश देणारे फलक यांचा विशेष समावेश होता. नागरिकांनी मार्गावरून फुलांचा वर्षाव करत मिरवणुकीचे स्वागत केले.
मिरवणुकीदरम्यान जयंती मंडळातर्फे उपस्थित मान्यवर, अधिकारी तसेच पोलीस प्रशासन यांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या माध्यमातून शांती, बंधुता व सामाजिक सलोखा राखण्यासाठी सर्व घटकांचे आभार व्यक्त करण्यात आले.
संपूर्ण कार्यक्रमादरम्यान प्रशासन व स्वयंसेवकांनी चोख बंदोबस्त ठेवत वाहतूक व्यवस्थापन सुरळीत केले. शहरभर प्रकाशयोजना, फलक आणि आकर्षक सजावट करण्यात आली होती.जयंती कार्यक्रमामुळे माहूर शहरात उत्साह, ऐक्यभाव आणि सांस्कृतिक विविधतेचा सुंदर संगम पाहायला मिळाला.

