कुंटूर
नायगाव तालुक्यातील कुंटूर येथे बसस्टँडलगत असलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या अगदी शेजारीच दिवसा ढवळ्या अवैध देशी-विदेशी दारू विक्री होत असल्याची गंभीर माहिती समोर आली आहे. शाळेच्या संरक्षण भिंतीला लागूनच अवैध दारूचे ठेके बेकायदेशीर व्यवसाय सुरु असून, चढ-उतार दराने दारू विक्री सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. नागरिकांच्या मते, बस स्टँड परिसरात अवैध दारू विक्री करणाऱ्यांना ना कायद्याची भीती, ना पोलीस प्रशासनाचा धाक दिसत आहे. उलट पोलीस प्रशासनाकडून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप होत असून, त्यामुळे “स्थानिक नेत्यांचा पाठींबा की पोलिसांचा आशीर्वाद?” असा प्रश्न जनतेत मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. सार्वजनिक ठिकाणी आणि शाळेजवळ सुरू असलेली ही बेकायदेशीर दारू विक्री परिसरातील शिस्त बिघडवत असून, मद्यधुंद व्यक्तींच्या वर्तणुकीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे सामाजिक वातावरण ढासळत चालले असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या गंभीर प्रकरणात पोलीस, उत्पादक,स्थानिक गुन्हे या प्रशासनाकडून कोणती ठोस कारवाई करणार, की हा अवैध धंदा असाच सुरू राहणार—हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. अवैध दारूचे ठेके गावाबाहेर काढण्यात यावे अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

