
जयकुमार अडकिने
माहूर- वाई बा. प्रा. आ. केंद्रा अंतर्गत असलेल्या मदनापूर उपकेंद्राअंतर्गत मदनापूर, सायफळ, व करळगाव या गावांचा समावेश असून मौजे मदनापूर येथे आरोग्य उपकेंद्राची कोट्यावधी रुपये खर्चून उभारण्यात आलेली आयुषमान आरोग्य मंदिर ही इमारत तोऱ्यात उभी आहे. परंतु या आरोग्य केंद्रात नियुक्ती असलेले वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी कुणीही येथे सहा महिन्यापासून वास्तव्यास नसल्याची बाब समोर आली आहे. या आरोग्य उपकेंद्रात नियुक्ती असलेल्या आरोग्य सेविका श्रीमती एस. बी. राठोड ह्या त्यांच्या मनमर्जीने दिवस भरात तास दोन तास आरोग्य उपकेंद्रात हजर राहत असून त्या माहूर येथून अप डाऊन करत तर आरोग्य सेवक सुमित सुर्यवंशी हे यवतमाळ येथून अपडाऊन करत कर्तव्य बजावत असल्याने शिवसेना उबाठा शाखा प्रमुख देवंना मल्लेलवार यांनी संपर्क साधल्याने वस्तुस्थिती दर्शविणारे वृत्त प्रकाशित झाले. त्यानंतर आरोग्य विभागाचे कर्मचारी डॉ. नरेंद्र आडे, आष्टा प्रा.आ.केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ. संदेश राठोड, ता. आरोग्य सहाय्यक गजभारे, यांनी दि.२२ रोजी मदनापूर आरोग्य उपकेंद्रास भेट देऊन नियुक्ती असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना उपकेंद्रात उपस्थित राहण्याबाबत सूचना देण्यात आल्या व भेटी अहवाल बुकात सुद्धा नोंद करून सूचना केली. यापूर्वी सुद्धा लेखी नोटीस संबधित कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या तरी सुद्धा निगरगट कर्मचारी आदेशाचे पालन करत नसल्याने परिस्थिती जैसे थे च आहे.
विशेष बाब म्हणजे संबधित एका कर्माचाऱ्याने प्रसारमाध्यामच्या प्रतिनिधीना वृत्त प्रकाशित केल्या बद्दल धन्यवाद असा व्हाटसप संदेश पाठवून आभार मानल्याने या मुजोर कर्माचाऱ्याना कर्तव्यास दांडी मारण्यासाठी नेमके पाठबळ तरी कोण देते ? हा जटील प्रश्न उपस्थित झाला आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. देशमुख, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेश माचेवाड नेमके करतात तरी काय याकडे आता सर्वाचे लक्ष लागले आहे.
या गंभीर बाबीकडे आता दस्तुरखुद्द जि.प. च्या कठोर प्रशासक मुख्य कार्यकारी अधिकारी यांनीच लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.

