
माहूर : डिजिटल व सोशल माध्यमे तसेच वृत्तवाहिन्यांच्या युगात पत्रकारिता वेगवान झाली असली, तरी आजही सर्वसामान्य नागरिकांची दिवसाची सुरुवात वृत्तपत्र वाचनाशिवाय होत नाही. त्यामुळे वृत्तपत्रे ही जीवनाचा अविभाज्य घटक बनली आहेत. मराठी वृत्तपत्रांची संख्या उल्लेखनीय असून, या माध्यमांतून सर्वसामान्यांचे व्यक्तिमत्त्व सर्वांगिण विकसित होत आहे. पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून, या स्तंभाच्या भक्कम कार्यामुळेच लोकशाही टिकून आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार हाजी कादर दोसानी यांनी केले.
दर्पण दिनानिमित्त मंगळवार, दिनांक ६ जानेवारी रोजी सकाळी ११.३० वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतकरी सभागृहात पत्रकार दिनानिमित्त माहूर तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान सोहळा व दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन असा कार्यक्रम तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सरफराज दोसानी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर माहूर तालुक्यातील कुपटी येथील ज्येष्ठ पत्रकार गोपाळराव कदम यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
दर्पण दिनानिमित्त बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सत्यनिष्ठ व निर्भीड पत्रकारितेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल माहूर तालुक्यातील पत्रकारांचा, ज्येष्ठ पत्रकार हाजी कादर दोसानी यांच्या वतीने स्मृतिचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी जिल्हा कार्यकारिणी सदस्य जयकुमार अडकिने, प्रा. प्रवीण बिरादार, गजानन भारती सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोपात सरफराज दोसानी यांनी समाजातील पत्रकारांचे महत्त्व स्पष्ट करताना सांगितले की, पत्रकार फक्त बातमी देऊन थांबत नाहीत, तर त्या बातमीचा पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावण्याचे कार्य करतात. वेळप्रसंगी संबंधित विभागांशी किंवा राजकीय नेत्यांशी मतभेद पत्करूनही पत्रकार समाजहितासाठी लढा देतात. आपल्या लेखणीतून पत्रकार अनेक सामाजिक परिवर्तन घडवून आणतात. डिजिटल माध्यमांच्या युगातही पत्रकारिता आज प्रभावी ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले.कार्यक्रमास राज ठाकूर, गजानन भारती, बालाजी कोंडे, संजय सोनटक्के, कैलास बेहेरे, सुभाष खडसे, अमजद पठाण, सूरज खोडके, नितेश बनसोडे, जावेद शेख, ज्ञानेश्वर कराळे, डॉ. द्रोणावर, राजकिरण देशमुख, विकास कपाटे, विश्वास पांडागळे, अरुण पवार, अविनाश पठाडे,संजय सिद्धेवाद, आदी पत्रकार व मान्यवर उपस्थित होते.सूत्रसंचालन सचिव राजकुमार पडलवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन सिद्धार्थ तामगाडगे यांनी मानले.

