ताज्या बातम्यानांदेड

अवैध रेती व्यावसायिकांकडून मारहाण; प्रकरण गंभीर वळणावर !

टिप्पर कोणाचा? गुन्हा नोंद असूनही कारवाई का नाही – संशय कायम: उच्च पदस्थ अधिकाऱ्याला शिवीगाळ करणारा व्यक्ती कोण?.

जयकुमार अडकिने

माहूर : माहूर तालुक्यात अवैध रेती उत्खनन व वाहतूक रोखण्यात महसूल व पोलिस प्रशासन सपशेल अपयशी ठरत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. दोन दिवसांपूर्वी अवैध रेती व्यावसायिकांकडून एका नागरिकास झालेल्या मारहाणीनंतर माहूर पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यामुळे हे वास्तव समोर आले आहे.

अवैध रेती वाहतुकीची वाहने सुसाटपणे सुरू असताना ती थांबविण्यात संबंधित विभाग असमर्थ ठरत असल्याने, “आता इंद्रदेवाला साकडे घालावे लागेल का?” असा उपरोधिक प्रश्न पर्यावरणप्रेमी नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, या मारहाणीच्या घटनेनंतर प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे. एक व्हायरल व्हिडिओ सध्या चर्चेत असून, त्यामध्ये उच्च पदस्थ अधिकाऱ्याला शिवीगाळ करण्यात आल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे या व्हिडिओबाबत अद्याप पोलिस ठाण्यात कोणतीही स्वतंत्र तक्रार दाखल झालेली नाही. मात्र, दिनांक १२ जानेवारी २०२६ रोजी अवैध रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परचे फोटो काढल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून हाणामारी झाली होती. या घटनेत तक्रारदाराचा मोबाईल फोडून सुमारे २३ हजार रुपयांचे नुकसान झाले असून, या प्रकरणी माहूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

या गुन्ह्याच्या तपासादरम्यान तक्रारदाराकडून प्राप्त व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी संबंधित टिप्पर कोणाचा आहे, याचा शोध घेऊन रेती चोरीसंदर्भातील प्रचलित कायद्यानुसार स्वतंत्र गुन्हा दाखल करणे अपेक्षित होते. मात्र, अद्याप संबंधित रेतीचा टिप्पर जप्त करण्यात आलेला नाही. त्यामुळे गुन्हा नोंद असूनही अद्याप ठोस कारवाई का झाली नाही, असा प्रश्न उपस्थित होत असून संशयाला वाव मिळत आहे.

दुसरीकडे, आज शुक्रवार दिनांक १६ जानेवारी रोजी १२ तारखेला घडलेल्या घटनेचा व्हिडिओ मागील-पुढील भाग कापून व्हायरल करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये उच्च पदस्थ अधिकाऱ्याला शिवीगाळ करणारा व्यक्ती कोण आहे, हेदेखील तपासाचा महत्त्वाचा भाग ठरत आहे.

या संपूर्ण प्रकरणात नेमके कोण कायद्याचे उल्लंघन करून कोणाला अप्रत्यक्ष संरक्षण देत आहे, याची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. यासाठी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी स्वतंत्र तपास पथक नेमून निष्पक्ष चौकशी करावी, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!