
देगाव येथील भूमिपुत्र आणि छावा युवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजेश पाटील मोरे यांनी घुंगराळा येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश केला. त्यांचा पक्षप्रवेश आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते आणि मा. शिवराज पाटील होटाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
गेल्या चार वर्षांपासून छावा संघटनेत सक्रिय भूमिका बजावताना, राजेश पाटील मोरे यांनी विविध पदांवर काम केले. त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये विश्वास निर्माण करत अखेर प्रदेशाध्यक्ष पदापर्यंतची घौडदौड पार केली. समाजकार्यातील त्यांची दृढ भूमिका आणि नेतृत्वगुण यामुळेच त्यांना एक सशक्त युवा नेता म्हणून ओळख मिळाली
मागील विधानसभा निवडणुकीच्या काळात शिवराज पाटील होटाळकर यांच्याशी संपर्क झाल्यानंतर, त्यांच्या नेतृत्वाने प्रेरित होऊन मोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या प्रवेशामुळे पक्षाच्या युवा गटाला नवसंजीवनी मिळणार असल्याची भावना पक्ष कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे.
या प्रसंगी जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी, प्रदेश सरचिटणीस वसंतराव पाटील सुगावे, युवक जिल्हाध्यक्ष बालाजी पाटील शिंदे, माजी सभापती अशोक पाटील मुगांवकर, विलास पाटील ढगे, राजेश पाटील ढगे, योगेश पाटील ढगे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेला हा पक्षप्रवेश, आगामी राजकीय समीकरणांवर परिणाम करणारा ठरू शकतो, अशी चर्चा सुरू आहे.

