
नायगाव :
क्रीडांगण विकासासाठी मंजूर करण्यात आलेल्या निधीच्या वापरात गंभीर अनियमितता उघड झाल्याने पळसगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला तब्बल ₹10.78 लाखांची रक्कम सव्याज परत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या घटनेमुळे शिक्षण व क्रीडा विभागात खळबळ उडाली असून संबंधितांवर कारवाईची मागणी जोर धरत आहे.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड यांच्या आदेशानुसार, सन 2022-23 मधील क्रीडांगण विकास योजनेअंतर्गत शाळेस ₹7 लाखांचे अनुदान देण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्ष पाहणी अहवाल व चौकशी समितीच्या निष्कर्षांनुसार या निधीचा योग्य वापर न झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
व्याजासह परतफेडीचा फटका
शासन निर्णयानुसार 18% दराने व्याज लावून एकूण रक्कम ₹10,78,000 इतकी झाली असून ती 15 एप्रिल 2026 पर्यंत परत करण्याचे सक्त आदेश देण्यात आले आहेत. अन्यथा पुढील कठोर कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
तक्रारीनंतर उघडकीस प्रकार
पळसगाव येथील नागरिकांनी श्री. बळवंत शिंदे व इतर यांनी स्वाक्षऱ्या करून केलेल्या तक्रारीनंतर हे प्रकरण समोर आले. त्यानंतर चौकशी समितीने प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल सादर केला आणि अखेर हा मोठा गैरव्यवहार उघड झाला.
प्रशासनाकडून कडक भूमिका
जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, “अनुदानाचा विनियोग नियमांनुसार झाला नसल्यास परतफेड अपरिहार्य आहे.” त्यामुळे संबंधित जबाबदारांवर कारवाईची शक्यता अधिक बळावली आहे.
मोठे प्रश्न उपस्थित…
क्रीडांगणाचा निधी गेला कुठे?; काम न करता कागदोपत्री पूर्तता दाखवली का ? ; जबाबदार अधिकारी व संबंधितांवर कारवाई कधी? ; पळसगाव प्रकरणामुळे जिल्ह्यातील इतर कामांचीही चौकशी होणार का?
या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यातील क्रीडांगण विकास कामांवर संशयाचे सावट पसरले असून पुढील काही दिवसांत आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



