ताज्या बातम्यानांदेडनायगाव

आंतरगाव येथे अवैध वाळू उत्खनन सुरूच; महसूल प्रशासनाच्या मूक संमतीचा आरोप, कठोर कारवाईची मागणी.

नायगाव  : बाळासाहेब पांडे

नायगाव तालुक्यातील आंतरगाव परिसरात गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उत्खनन मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे, हा प्रकार अनेक दिवसांपासून सुरू असतानाही महसूल विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या अवैध उत्खननाला महसूल प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने मूक संमती मिळत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

स्थानिकांच्या माहितीनुसार, रात्रीच्या वेळी तसेच पहाटेच्या सुमारास यांत्रिक साधनांच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा केला जात आहे. नदीपात्रात पाईप टाकून पाण्याबरोबर वाळू उपसण्याची प्रक्रिया सुरू असून, ट्रॅक्टर व इतर वाहनांच्या माध्यमातून ती वाळू बाहेर नेली जात आहे. यामुळे शासनाला मोठ्या प्रमाणात महसूल तोटा होत आहे.

ग्रामस्थांनी सांगितले की, अनेक वेळा संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रारी देऊनही कोणतीही ठोस दखल घेतली जात नाही. उलट, काही ठिकाणी कारवाईचे केवळ दिखाऊ प्रयत्न करून पुन्हा उत्खननाला मोकळीक दिली जाते, अशीही चर्चा आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

अवैध वाळू उत्खननामुळे पर्यावरणावरही गंभीर परिणाम होत असून नदीपात्राची झपाट्याने झीज होत आहे. पाण्याची पातळी खालावत असून भविष्यात पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच, या उत्खननामुळे परिसरातील शेतीवरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून अवैध वाळू उत्खनन पूर्णतः बंद करावे, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि महसूल विभागातील जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. अन्यथा आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!