
नायगाव :
वारकरी संप्रदायातील थोर संत श्री संत गोरोबा काका यांच्या पुण्यतिथीनिमित्त कोलंबी (ता. नायगाव, जि. नांदेड) येथे भव्य मूर्ती स्थापना व महाप्रसाद सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक कार्यक्रमामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार असून भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
कार्यक्रमाचे आयोजन समस्त गावकरी मंडळी, कोलंबी यांच्या वतीने करण्यात आले असून मूर्ती स्थापनेचा शुभारंभ श्री १०८ महंत यदुबन गुरु गंभीरबन महाराज कोलंबी यांच्या शुभहस्ते होणार आहे.
बुधवार दिनांक १५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९ वाजता श्री विठ्ठल मंदिर, कोलंबी येथे मूर्ती स्थापना करण्यात येणार आहे. यानिमित्त सकाळी १० वाजता ह.भ.प. वासुदेव महाराज कोलंबीकर यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे.
कीर्तनानंतर सर्व भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या धार्मिक सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


