
नायगाव : बाळासाहेब पांडे
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषी महाविद्यालय, नायगाव येथील विद्यार्थ्यांनी विविध कॅम्पस प्लेसमेंटमध्ये उल्लेखनीय यश संपादन करत महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले आहे. आयडियल अॅग्री सर्व्हिस प्रा. लि. या नामांकित कंपनीत 20 विद्यार्थ्यांची निवड झाली असून ग्रीन गोल्ड सीड्स प्रा. लि. मध्ये 4 विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे.ही कॅम्पस मुलाखत प्रक्रिया अत्यंत स्पर्धात्मक वातावरणात पार पडली.
तांत्रिक मुलाखतींसह वैयक्तिक संवादाच्या विविध टप्प्यांमधून विद्यार्थ्यांची कसून चाचणी घेण्यात आली. या सर्व टप्प्यांत विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास, तांत्रिक ज्ञान आणि संवाद कौशल्य यांचे उत्कृष्ट प्रदर्शन करत कंपन्यांच्या अपेक्षांवर खरे उतरले.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा नांदेड लोकसभेचे खासदार प्रा. रवींद्र वसंतराव चव्हाण यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नाविन्यपूर्ण कार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी महाविद्यालयाचे संचालक डॉ. आर. सी. लव्हेकर व प्राचार्य डॉ. आर. जी. नारे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांच्या मेहनतीचे आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांचे विशेष अभिनंदन केले.कॅम्पस प्लेसमेंट यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी प्लेसमेंट सेल अधिकारी व समन्वयक प्रा. डॉ. संदीप पांचाळ तसेच सहाय्यक प्राध्यापक डॉ. शरद रोंडगे यांनी मोलाचे योगदान दिले.
या यशामुळे महाविद्यालयाची शैक्षणिक गुणवत्ता, अध्यापन पद्धती आणि विद्यार्थ्यांची क्षमता पुन्हा एकदा अधोरेखित झाली असून परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. भविष्यातही अधिकाधिक विद्यार्थी उच्च पदांवर निवड होऊन महाविद्यालयाचा गौरव वाढवतील, असा विश्वास महाविद्यालय प्रशासनाने व्यक्त केला आहे.


