
नायगाव :
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत सुगावे पाटील यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त कोणताही जल्लोष न करता स्व. अजितदादांच्या आठवणींना उजाळा देत बारामती येथे त्यांच्या स्मृतिस्थळी जाऊन अभिवादन केले. अजितदादांच्या अकाली निधनाच्या वेदना आजही कायम असल्याची भावना व्यक्त करत त्यांनी यंदाचा वाढदिवस साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला.
जन्मदिनाच्या पार्श्वभूमीवर बारामती येथे पोहोचलेल्या वसंत सुगावे पाटील यांनी स्व. अजितदादांच्या स्मृतिस्थळी पुष्पहार अर्पण करून नतमस्तक होत आदरांजली वाहिली. यावेळी ते भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. अजितदादांसोबतच्या आठवणींना उजाळा देताना त्यांनी त्यांच्या नेतृत्वाची, कार्यशैलीची आणि कार्यकर्त्यांवरील प्रेमाची आठवण सांगितली.
नांदेड जिल्ह्यात अजितदादा आणि वसंत सुगावे पाटील यांचे जिव्हाळ्याचे संबंध सर्वश्रुत होते. त्यामुळे त्यांच्या निधनानंतर निर्माण झालेली पोकळी आजही कार्यकर्त्यांच्या मनात कायम असल्याचे वातावरण या भेटीदरम्यान दिसून आले.
त्यानंतर वसंत सुगावे पाटील यांनी बारामती येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयाला भेट देत अजितदादांच्या निवासस्थानी युवा नेते जयदादा पवार यांची भेट घेत संवाद साधला. यावेळी बारामती पंचायत समितीचे सभापती किरण तावरे उपस्थित होते.
या प्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अतुल हिंगमिरे, राष्ट्रवादी काँग्रेस ग्रंथालय आघाडीचे प्रदेश कार्याध्यक्ष संतोष दगडगावकर, माजी सरपंच साईनाथ पाटील फाजगे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



