
माहुर :
माहूर : पत्रकारांशी कथित शिवीगाळ, धमकी व अर्वाच्य भाषा वापरल्याचा आरोप करत खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी मराठी पत्रकार परिषद, तालुका शाखा माहूरच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात सोमवारी (दि. २९) तहसीलदार, माहूर यांना निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारांशी अशा प्रकारची कथित वर्तणूक ही अत्यंत निषेधार्ह असून त्यामुळे पत्रकारांच्या सुरक्षिततेसह अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. माहिती मिळविण्यासाठी प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांना कथितरित्या अर्वाच्य भाषेत बोलणे, धमकी देणे व दबाव टाकण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
मराठी पत्रकार परिषदेने या प्रकरणाची तातडीने सखोल चौकशी करून खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. तसेच भविष्यात पत्रकारांवर अशा प्रकारच्या घटना घडू नयेत, यासाठी पत्रकारांच्या सुरक्षिततेची हमी देत आवश्यक उपाययोजना करण्याची मागणीही प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
हे निवेदन मराठी पत्रकार परिषद, तालुका शाखा माहूरचे अध्यक्ष सरफराज दोसानी यांच्या नेतृत्वाखाली सचिव राजकुमार पडलवार, जिल्हा कार्यकारिणी सदस्य जयकुमार अडकीने, राज ठाकूर, गजानन भारती, बालाजी कोंडे, सिद्धार्थ तामगाडगे, सुभाष खडसे, अजय कंधारे, अमजद खान हैदर खान, विश्वास पंडागळे, अरुण पवार, अमजद खान, जावेद, प्रा. प्रवीण बिरादार, कैलास बेहेर,राज किरण देशमुख आदींच्या स्वाक्षरीने तहसीलदारांकडे सादर करण्यात आले.



