
नायगाव :
नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी (एनडीसीसी) बँकेच्या निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत असून, ‘ब’ प्रक्रिया व पणन मतदारसंघातून भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी सभापती श्रावण पाटील भिलवंडे नरसीकर यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या उमेदवारीमुळे या मतदारसंघातील निवडणूक अधिक चुरशीची होण्याची चिन्हे निर्माण झाली असून, सहकार आणि राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत उत्साहपूर्ण वातावरणात अर्ज दाखल करण्यात आला. या उपस्थितीतून पक्षाने या मतदारसंघात विजयासाठी सर्व ताकद पणाला लावल्याचे स्पष्ट संकेत दिले.
यावेळी भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजेश देशमुख कुंटूरकर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य बालाजी बच्चेवार, युवा नेते रुपेश कुंटूरकर, आनंदराव बावणे भोपाळकर, माजी जिल्हा परिषद सदस्य सूर्याजी चाडकर, ज्येष्ठ पत्रकार भूषण पारळकर, गोविंद नरसीकर, दत्ता पाटील होटाळकर, बालाजी गंगासागरे यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक ही जिल्ह्यातील सहकार क्षेत्रासाठी तसेच स्थानिक राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाते. बँकेच्या संचालक मंडळावर वर्चस्व मिळविण्यासाठी विविध राजकीय गटांनी जोरदार तयारी सुरू केली असून, प्रत्येक मतदारसंघात प्रतिष्ठेच्या लढती रंगण्याची शक्यता आहे.
विशेषतः ‘ब’ प्रक्रिया व पणन मतदारसंघात श्रावण पाटील भिलवंडे नरसीकर यांच्या उमेदवारीमुळे निवडणुकीतील राजकीय समीकरणांना वेग आला आहे. त्यांच्या दीर्घकालीन सहकारी आणि राजकीय अनुभवामुळे ही लढत अधिक लक्षवेधी ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचत असल्याने इच्छुक उमेदवारांच्या हालचालींना वेग आला आहे. येत्या काही दिवसांत उमेदवारी अर्जांची छाननी, माघार आणि अंतिम उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे. त्यामुळे ‘ब’ प्रक्रिया व पणन मतदारसंघात विजयाची बाजी कोण मारणार, याकडे सहकार क्षेत्रासह संपूर्ण नांदेड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.



