
नायगाव : बाळासाहेब पांडे
वारकरी संप्रदायाची अखंड परंपरा जपत नरसी येथील श्रीराम मंदिर देवस्थानाच्या वतीने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यासमवेत निघणाऱ्या पारंपरिक पायी दिंडीचे प्रस्थान गुरुवार, २ जुलै २०२६ रोजी होणार आहे. परमपूज्य सद्गुरू गुंडा (चंद्रशेखर) महाराज देगलूरकर यांच्या कृपाशीर्वादाने आयोजित या दिंडी सोहळ्यामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, वारकरी आणि भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
दिंडी प्रस्थानापूर्वी सकाळी ११ वाजता गुरुपूजन, वारीचे महत्त्व सांगणारे प्रवचन, आरती व महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर सद्गुरूंच्या शुभहस्ते दिंडीचे प्रस्थान होईल. आळंदी ते पंढरपूर अशी ही पायी वारी पार पडणार असून, आषाढी एकादशीच्या सोहळ्यात सहभागी झाल्यानंतर २६ जुलै रोजी दिंडीचा समारोप होणार आहे.
वारीपूर्वी भाविकांना परळी वैजनाथ, पैठण, नेवासा, शनिशिंगणापूर, शिर्डी, नाशिक, त्र्यंबकेश्वर, ब्रह्मगिरी, भीमाशंकर, देहू आणि आळंदी या पवित्र तीर्थक्षेत्रांचे दर्शन घडविण्यात येणार आहे. त्यामुळे धार्मिक पर्यटनासह अध्यात्मिक साधनेचीही संधी वारकऱ्यांना मिळणार आहे.
दिंडीदरम्यान दररोज हरिपाठ, नामस्मरण, भजन, कीर्तन, प्रवचन, भारूड आणि आध्यात्मिक चिंतनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. विविध भागांतील नामवंत कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक आणि भजन मंडळींच्या सहभागामुळे संपूर्ण वारीत भक्तिरसाचा अखंड वर्षाव होणार आहे.
आयोजकांनी दिंडीतील शिस्तीवर विशेष भर दिला आहे. केवळ निर्व्यसनी, शिस्तप्रिय आणि वारकरी परंपरेचे पालन करणाऱ्या भाविकांनाच प्रवेश दिला जाणार असून, गुटखा, तंबाखू, मद्य, सिगारेट व इतर कोणत्याही व्यसनास सक्त मनाई करण्यात आली आहे. प्रत्येक वारकऱ्याने स्वतःचे आवश्यक साहित्य, औषधे, पाण्याची बाटली तसेच अंथरूण-पांघरूण सोबत ठेवावे आणि मौल्यवान वस्तू आणू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
वारीदरम्यान आळंदी, पुणे, सासवड, जेजुरी, लोणंद, तरडगाव, फलटण, नातेपुते, माळशिरस, वेळापूर, वाखरी आणि पंढरपूर येथे मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली आहे. विविध दानशूर भाविकांनी पंगत, निवास व अन्य सेवांची जबाबदारी स्वीकारल्याने वारकऱ्यांची सोय करण्यात येणार आहे.
या दिंडी सोहळ्यास ह.भ.प. चंद्रशेखर महाराज देगलूरकर, एकनाथ शास्त्री महाराज पाळेकर, शुभम महाराज शेळकेवाडीकर, वासुदेव महाराज कोलंबीकर, योगेश महाराज, पांडुरंग महाराज वागे नरसीकर, भगवानराव पाटील महाराज, रामकिशन महाराज, बालाजी महाराज नरसीकर यांच्यासह अनेक संत, प्रवचनकार, कीर्तनकार, भजनाचार्य व वादकांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
दिंडीचे प्रमुख ह.भ.प. रामायणाचार्य रामकिशन महाराज (राम मंदिर देवस्थान, नरसी) यांनी परिसरातील सर्व वारकरी, टाळकरी, गायक, वादक, भजनप्रेमी आणि भाविकांनी या पवित्र वारीत सहभागी होऊन संतसंग, नामस्मरण आणि विठ्ठलभक्तीचा अमूल्य लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.



