Uncategorized

नारळी पौर्णिमा (परिक्रमा यात्रा) यात्रेच्या पूर्वतयारीचा बैठकीत आढावा.

माहुर – जयकुमार अडकीने

नारळी पौर्णिमा अर्थात रक्षाबंधनाच्या पावन पर्वानिमित्त श्रीक्षेत्र माहूर येथे होणाऱ्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर यात्रेच्या नियोजनाचा आढावा घेण्यासाठी सोमवारी, दि. २४ ऑगस्ट रोजी दत्तशिखर येथे सर्व संबंधित विभागांच्या प्रमुखांची बैठक पार पडली. महंत डॉ. धनेश्वर भारती महाराज यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासह वाहतूक, आरोग्य, वीज, पाणी, वनक्षेत्रातील सुरक्षा तसेच कायदा-सुव्यवस्थेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.नारळी पौर्णिमेनिमित्त श्रीक्षेत्र माहूर येथे मोठ्या संख्येने भाविक दाखल होण्याची शक्यता असल्याने यात्रेचे नियोजन काटेकोरपणे करण्यावर बैठकीत भर देण्यात आला. विशेषतः दत्त शिखर संस्थानने एकंदरीत 950 स्वयंसेवक सेवेकरी यांचे नियुक्ती करण्यात आली. दत्तशिखर परिसर तसेच यात्रेचा मार्ग मोठ्या प्रमाणात जंगलातून जात असल्याने भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना, वन्यप्राण्यांपासून संरक्षण आणि आपत्कालीन परिस्थितीत तातडीची मदत उपलब्ध करून देण्याबाबत वनविभागाशी समन्वय साधण्यावर चर्चा झाली.यात्रेदरम्यान संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहनतळ, वाहतूक नियमन, भाविकांसाठी पायी मार्गाची व्यवस्था तसेच आवश्यक ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्याबाबतही आढावा घेण्यात आला. भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने वैद्यकीय पथके, प्राथमिक उपचार केंद्रे, आवश्यक औषधसाठा आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवा सज्ज ठेवण्याच्या सूचना आरोग्य विभागाला देण्यात आल्या.यात्रेदरम्यान वीजपुरवठा सुरळीत राहावा तसेच गर्दीच्या ठिकाणी सुरक्षित विद्युत व्यवस्था करण्यात यावी, याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. महामार्गावरील वाहतूक व्यवस्था, रस्त्यांची स्थिती, आवश्यक दिशादर्शक फलक तसेच भाविकांच्या सोयीसाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचाही बैठकीत आढावा घेण्यात आला.या बैठकीस तहसीलदार अभिजीत जगताप, पोलीस निरीक्षक देविदास चोपडे, नगराध्यक्ष, तालुका आरोग्य अधिकारी, वनविभाग, महावितरण, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे संबंधित अधिकारी, नगरपंचायत कार्यालयीन व्यवस्थापक संदीप गजलवाड, आगार प्रमुख, दत्तशिखर संस्थानचे व्यवस्थापक नाईक, व पदाधिकारी, रेणुका देवी संस्थानचे विश्वस्त चंद्रकांत भोपे, संजय कान्नव, कार्यालयीन व्यवस्थापक विजय राठोड यांच्यासह परिसरातील विविध गावांचे पोलीस पाटील व माध्यम प्रतिनिधी उपस्थित होते.यात्रा काळात भाविकांची सुरक्षितता आणि सुविधा यांना सर्वोच्च प्राधान्य देत सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने काम करण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button