
माहूर : श्री रेणुका देवी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, श्रीक्षेत्र माहूर येथील पर्यावरणशास्त्र विभागाच्या वतीने पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवत मातीच्या गणेशमूर्ती स्वतः तयार केल्या. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना शाश्वत उपक्रमांची प्रत्यक्ष अनुभवातून जाण आली.
महाराष्ट्र शासनाने गणेशोत्सव हा राज्य उत्सव म्हणून घोषित केला असून, त्याच अनुषंगाने पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. मातीच्या मूर्तीमुळे जलप्रदूषण टळते, नद्या व जलस्रोत सुरक्षित राहतात तसेच सण साजरा करताना पर्यावरणाचे भान ठेवले जाते, यावर या कार्यशाळेत विशेष भर देण्यात आला.
हा उपक्रम संस्थेचे अध्यक्ष प्रफुल राठोड, सचिव सौ. संध्याताई राठोड, सहसचिव नकुल राठोड, प्राचार्य प्रा. डॉ. विलास पाटील, उपप्राचार्य डॉ. राजेंद्र लोने व डॉ. मेहनाज मुजेवार, संस्था समन्वयक डॉ. टी एम गुरूनुले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. पर्यावरणशास्त्र विभागप्रमुख डॉ. रंगनाथ गोचडे व सहाय्यक प्राध्यापक डॉ. अभिजित कांडलीकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून कार्यशाळेचे नेतृत्व केले.
विद्यार्थ्यांनी “पर्यावरण वाचवा, नदी वाचवा, भविष्यासाठी बदल घडवा” असे संदेश देत सण आनंदाने आणि जबाबदारीने साजरा करण्याचे आवाहन केले.
या कार्यशाळेद्वारे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दलची जबाबदारी विकसित झाली असून, भविष्यात गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.

