
नायगाव : बाळासाहेब पांडे
नायगाव तालुक्यातील सामाजिक समतेचे प्रणेते कै. मा.आ. बळवंतराव पाटील चव्हाण व नांदेड जिल्ह्याचे लोकनेते स्व. खासदार वसंतराव बळवंतराव पाटील चव्हाण यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण हा एक ऐतिहासिक सोहळा दि. २६ ऑगस्ट रोजी नायगाव येथे भव्यदिव्य पद्धतीने पार पडणार आहे. या सोहळ्याचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते मा. शरदचंद्रजी पवार यांच्या शुभहस्ते होणार असून, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे राहणार आहेत.
यावेळी विशेष पाहुणे म्हणून कोल्हापूरचे खासदार छत्रपती शाहू महाराज, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खा. अशोकराव चव्हाण यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. तसेच महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील मान्यवर, खासदार, आमदार, जिल्ह्यातील दिग्गज नेतेमंडळी, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरही या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
या अनावरण सोहळ्यानिमित्त हनुमान मंदिर परिसरात दुपारी १ ते संध्याकाळी ६ या वेळेत सर्व उपस्थितांसाठी भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. त्यानंतर रात्री ८ ते ११ या वेळेत ह.भ.प श्री. पुरुषोत्तम महाराज पाटील (बुलढाणा) यांचे कीर्तन होणार असून, परिसर भक्तीमय वातावरणाने निनादणार आहे. कार्यक्रमासाठी परिसरातील नागरिक, शेतकरी, युवक व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन खासदार रवींद्र चव्हाण व चव्हाण कुटुंबीयांच्या वतीने करण्यात आले आहे.
कै. मा.आ. बळवंतराव पाटील चव्हाण हे नायगाव तालुक्यातील प्रगल्भ समाजसेवक व सामाजिक समतेचे प्रणेते म्हणून ओळखले जात. शेतकरी, कामगार, दलित-शोषित यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांनी समाजामध्ये समानतेचा भाव दृढ करण्याचे कार्य केले. त्यांचा सामाजिक वारसा पुढे नेत त्यांचे सुपुत्र स्व. खासदार वसंतराव चव्हाण यांनी राजकारणात प्रवेश केला. लोकसभेत निवडून आलेल्या वसंतराव चव्हाण यांनी अल्पकाळातच शेतकरी, कामगार, विद्यार्थी व सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना अग्रक्रम देऊन लोकनेते म्हणून आपली ओळख निर्माण केली. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक विकासकामांना गती मिळाली व जनतेच्या मनात आत्मीयतेचा भाव निर्माण झाला.
दोन पवार,दोन चव्हाण येणार एकत्र
नायगावात होणाऱ्या या अनावरण सोहळ्याकडे संपूर्ण मराठवाड्यासह महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.शरद पवार व अजित पवार ,तर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व पृथ्वीराज चव्हाण पुन्हा एकदा एका स्टेज वर एकत्रित येणार?या निमित्तानं सर्व राजकीय पक्षाचा मेळा या चव्हाण पिता पुत्राच्या पुतळा अनावरण निमित्ताने एकत्र येणार का? अशी सर्वत्र चर्चा जोरदार आहे.
या अनावरण सोहळ्या निमित्ताने मान्यवर मंडळीच्या स्वागता साठी नांदेड नरसी देगलूर,बिलोली,मुखेड मार्गावर सर्वत्र बॅनर व कट आऊट लावण्यात आले आहेत.. नायगाव शहरात कमानी लाऊन मान्यवर मंडळीचे स्वागताची तयारी जोरदार करण्यात आली आहे.


