
नायगाव
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष संक्षिप्त मतदार यादी पुनरीक्षण (SIR) – २०२६ मोहिमेला प्रारंभ झाला असून, प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत अचूक राहावे, नव्या मतदारांची नोंद वेळेत व्हावी तसेच आवश्यक दुरुस्त्या मुदतीत पूर्ण व्हाव्यात, यासाठी नागरिकांनी या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन भाजप नेते श्रावण पाटील भिलवंडे यांनी केले आहे.
मतदार यादीतील अचूकता ही लोकशाही प्रक्रियेचा अत्यंत महत्त्वाचा पाया असून, प्रत्येक पात्र नागरिकाला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी निवडणूक आयोगाकडून विशेष पुनरीक्षण मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत बूथ लेव्हल अधिकारी (BLO) घरभेटी देऊन प्रगणन फॉर्मचे वितरण, माहिती संकलन तसेच आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करणार आहेत. प्रत्येक घराला तीन वेळा भेट देण्यात येणार असल्याने नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांना सहकार्य करावे, असेही भिलवंडे यांनी नमूद केले.
याबाबत अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, ५ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर नागरिकांनी स्वतःचे तसेच कुटुंबातील सर्व सदस्यांचे नाव मतदार यादीत आहे की नाही, याची खात्री करून घ्यावी. नाव समाविष्ट करणे, वगळणे किंवा दुरुस्तीबाबत ५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर २०२६ या कालावधीत दावे व हरकती दाखल करता येणार आहेत. प्राप्त अर्जांवर सुनावणी घेऊन ३ ऑक्टोबर २०२६ पर्यंत निर्णय घेण्यात येणार असून, त्यानंतर ७ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
श्रावण पाटील भिलवंडे यांनी पुढे सांगितले की, मतदानाचा अधिकार हा लोकशाहीतील सर्वांत महत्त्वाचा अधिकार आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने आपल्या नावाची खात्री करून आवश्यक असल्यास दुरुस्तीची प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी. तसेच ही माहिती आपल्या परिसरातील नागरिकांपर्यंत पोहोचवून एकही पात्र मतदार मतदार यादीपासून वंचित राहणार नाही, यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.



